पीटीआय, नवी दिल्ली
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदाचा चषक आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून स्वीकारण्यास नकार देण्याच्या भारताच्या भूमिकेला श्रीलंका आणि अफगाणिस्तानकडून पाठिंबा मिळाला असला, तरी नक्वी यांनी मात्र चषक भारताला न देण्याचा हट्ट सोडलेला नाही.
आशिया चषक सध्या ‘एसीसी’च्या कार्यालयात असून, तो माझ्या हस्तेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिनिधीने स्वीकारावा अशी ठाम भूमिका नक्वी यांनी घेतली आहे. मात्र, ‘बीसीसीआय’ने त्याला नकार दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा पुनरुच्चार ‘बीसीसीआय’ने केला आहे.
दरम्यानच्या काळात श्रीलंका आणि अफगाणिस्तानसह अन्य सदस्य मंडळांच्या प्रतिनिधींनी चषक भारताला देण्यात यावा याबाबत नक्वी यांना पत्र लिहिले होते. यावर ‘बीसीसीआय’चे सचिव देवजीत सैकिया आणि ‘एसीसी’ प्रतिनिधी राजीव शुक्ला यांच्यादेखील स्वाक्षऱ्या होत्या. ‘एसीसी’च्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी त्याने नक्वीदेखील आपला हट्ट सोडायला तयार नाहीत, असे सांगितले. ‘बीसीसीआय’च्या प्रतिनिधीने दुबई कार्यालयात येऊन माझ्या हस्तेच हा चषक स्वीकारावा अशी नक्वी यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हा विषय ‘आयसीसी’च्या आगामी बैठकीतच सोडवला जाऊ शकतो, असेही या सूत्राने सांगितले. पहलगाम येथील हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचा आदर म्हणून भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते, तसेच ‘एसीसी’ अध्यक्ष नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यासही नकार दिला होता.
‘एसीसी’च्या बैठकीतही नक्वी मतावर ठाम
स्पर्धेनंतर झालेल्या ‘एसीसी’च्या बैठकीतही भारतीय पदाधिकारी आणि नक्वी यांच्यात शाब्दिक खडाखडी झाली होती. मात्र, त्यांनी काही केल्या आपला हट्ट सोडला नाही. त्यानंतर ‘एसीसी’च्या बहुतेक सदस्यांनी ‘बीसीसीआय’ला या सर्व प्रकरणात पाठिंबा दिला होता. ‘एसीसी’कडे चषक देण्याची विनंतीदेखील केली होती. मात्र, नक्वी कुणाचेही ऐकून घेण्यास तयार नाहीत. विजेतेपदाचा चषक ‘एसीसी’ अध्यक्षांच्या हस्ते दिला जातो ही प्रथा आहे आणि मी ‘एसीसी’चा अध्यक्ष आहे. त्यामुळे पारितोषिक वितरण माझ्याच हस्ते होणार असे नक्वी यांनी स्पष्ट करताना चषक ‘एसीसी’च्या कार्यालयात आणला. तसेच त्यांच्या परवानगीशिवाय चषकाला हात लावण्यासही त्यांनी मज्जाव केला आहे.