दुबईतल्या आयसीसी क्रिकेट अकादमीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विकेटकीपर बॅट्समन बॅट्समन संजू सॅमसन यांच्यात तीन मिनिटं बोलणं झालं. हे संभाषण संजू सॅमसन अंतिम अकरात असेल की नाही यासंदर्भात सूचक भाष्य करणारं आहे.

टी२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावल्यानंतर राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचं प्रशिक्षकपद सोडलं. यानंतर गौतम गंभीर यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन यांच्या कारकिर्दीला संजीवनी मिळाली. गंभीर यांनी संजूला टी२० प्रकारात सलामीवीर म्हणून भूमिका दिली. संजूने सलामीवीर म्हणून खेळताना १० पैकी ३ डावात झंझावाती शतक झळकावत गंभीर यांचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची रचना बदलली जाणार असल्याचं संकेत पाहायला मिळत आहेत. युएईविरुद्धच्या सलामी लढतीत संजूला अंतिम अकरात स्थान मिळण्याची शक्यता कमी दिसते आहे.

भारतीय संघ या सामन्याच्या सरावकरता मैदानात पोहोचला. त्यावेळी संजू सर्वसज्ज असा खेळायला उतरला. त्याने एकट्याने विकेटकीपिंगचा सराव केला. त्यावेळी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप उपस्थित होते. एक शानदार झेल टिपल्याबद्दल दिलीप यांनी संजूचं कौतुक केलं.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीर यांनी त्यानंतर संजूशी संवाद साधला. तीन मिनिटं गंभीर संजूशी बोलत होते. या काळात संजू ऐकण्याचं काम करत होता. विकेटकीपिंगपेक्षा गंभीर बॅटिंगबद्दल बोलत असावेत असं जाणवलं. मात्र तरीही नंतर संजूला फलंदाजीच्या सरावाकरता एकदाही बोलावण्यात आलं नाही. तो एकटा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

भारतीय संघाच्या सराव सत्राकडे नजर टाकली तर युएईविरुद्ध संजूऐवजी जितेश शर्माला प्राधान्य मिळू शकतं असे संकेत मिळत आहेत. जितेशने कसून सराव केला. जितेशने शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या बरोबरीने बॅटिंगचा कसून सराव केला. यानंतर शुबमन गिल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी एकदोनदा नव्हे तर तीनवेळा फलंदाजीचा सराव केला.

संजू बॅटिंगसाठी तय्यार होता मात्र थोड्या वेळाने तो तिथून निघून गेला. काही वेळानंतर ड्रेसिंगरुमजवळच्या एका झाडाखाली तो बसला असल्याचं पाहायला मिळालं. थोड्या वेळाने तो नेट्सजवळ आला. पण संघव्यवस्थापनाकडून कोणतीही सूचना न मिळाल्याने तो तिथून उठला आणि आईसबॉक्सवर जाऊन बसला.

सलामीला संजू की शुबमन?

शुबमन गिलने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती. शुबमन टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे टी२० संघासाठी त्यांचा विचार झाला नव्हता. पण आता टेस्ट आणि वनडे नसल्यामुळे शुबमन टी२० संघात परतला आहे. शुबमनचं पुनरागमन झाल्यामुळे संजूला अंतिम अकरात स्थान मिळणं कठीण झालं आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने तडाखेबंद सुरुवात करून दिली आहे. दोघांच्या खेळामध्ये चांगला ताळमेळ आहे पण असं असलं तरी संजूऐवजी शुबमनला पसंती मिळण्याची चिन्हं आहेत. संजूऐवजी शुबमन सलामीला येण्याची शक्यता आहे. विकेटकीपर बॅट्समन म्हणून जितेश शर्माचा प्राधान्याने विचार होत असल्याचं दिसतं. जितेश मधल्या फळीत खेळतो आणि फिनिशरची भूमिका बजावतो.

सगळ्यांचा सराव झाल्यानंतर संजूला बॅटिंगची संधी मिळाली. नेट बॉलरने संजूला स्वैर चेंडू टाकला. त्यावर चौकार-षटकार लगावण्याचा संजूचा प्रयत्न फसला. एकूणातच सोमवारचा दिवस संजूसाठी कसा होता याचं ते प्रतीक होतं.

अजित आगरकर यांच्या निवडसमितीने आशिया चषकासाठी संघनिवड करताना शुबमन गिलला नुसतंच संघात स्थान दिलं नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही संघांचा शुबमन भाग असेल याचेच ते संकेत होते. शुबमनचा समावेश संजूसाठी अडचणीचा ठरू शकतो.