भारतीय आणि मराठमोळा जलतरणपटू वीरधवल खाडे याने टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय जलतरणपटूंबाबत भाष्य करणाऱ्या एका यूझरला चांगलेच सुनावले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय जलतरणपटूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. बॅकस्ट्रोक प्रकारातील जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि माना पटेल यांच्या कामगिरीवर एका यूझरने टीका केली. त्यानंतर वीरधवलने ट्वीटद्वारे या यूझरला सणसणीत उत्तर दिले.

या यूझरने ट्वीट करून लिहिले, की तयारी नसल्यास खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवणे थांबवा. ही ऑलिम्पिक आहे, निम्न दर्जाची स्पर्धा नाही. हे खेळाडू त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. हे लाजिरवाणे आहे. ट्युनिशिया देशाकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे.

२०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक जिंकणार्‍या वीरधवल खाडेला या यूझरने म्हणणे पटले नाही. तो आपल्या उत्तरात म्हणाला, “तुमचा उपाय म्हणजे खेळाडूंना न पाठवणे. घरी बसून टिप्पणी करणे खूप सोपे आहे. मला खात्री आहे, की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली प्रत्येक सामन्यात शतके ठोकत नाहीत. कदाचित बीसीसीआयने विराटला संघाबाहेर ठेवण्याचा विचार केला पाहिजे.’

 

वीरधवलच्या उत्तरावर हा यूझर सहमत नव्हता. तो म्हणाला, ”क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाही. ऑलिम्पिकमध्ये विविध देशांतील खेळाडू पहा. ट्युनिशियासारख्या छोट्या देशाने सुवर्ण जिंकले.”

 

हेही वाचा – दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ‘प्रमुख’ खेळाडू मैदानात परतला

वीरधवलने पुन्हा या यूझरच्या ट्वीटवर उत्तर दिले. तो म्हणाला, “आमच्या जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासाठी गेल्या एक वर्षापासून परिश्रम घेतले आहेत, जे कौतुकास्पद आहे. आम्ही १० वर्षांपूर्वीच्यापेक्षा चांगले आहोत आणि येत्या १० वर्षांत आम्ही अधिक उत्तम होऊ.” वीरधवलच्या या उत्तरावरही यूझरने सहमती दर्शवली नाही.

कोण आहे वीरधवल खाडे?

वीरधवल खाडे हा ऑलिम्पिक जलतरणपटू आहे. त्याने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५०, १०० आणि २०० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पात्रता फेरी जिंकून त्याने कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र तो उपांत्य फेरीत प्रवेश करण्यास अपयशी ठरला. ५० मीटर प्रकारात त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१०च्या भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत २९ वर्षीय वीरधवलने कांस्यपदक जिंकले. २०११ मध्ये भारत सरकारने त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.