रोनाल्डोने पेनल्टीची संधी गमावली; दोन्ही क्लबला तीन गुण मिळवण्यात अपयश
ला लिगा फुटबॉल स्पध्रेत जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या रिअल माद्रिद आणि अॅटलेटिको माद्रिद या मातब्बरांना रविवारी मध्यरात्री अनुक्रमे मॅलगा क्लबने १-१ असे आणि व्हिलारिअलने गोलशून्य बरोबरीत रोखले. या निकालामुळे माद्रिद आणि अॅटलेटिकोचा मार्ग खडतर झाला असून हे निकाल गतविजेत्या बार्सिलोनाच्या पथ्यावर पडले आहेत. आठ गुणांच्या आघाडीसह बार्सिलोनाची (६३) अव्वल स्थानावरील पकड मजबूत झाली आहे. अॅटलेटिको (५५) आणि माद्रिद (५४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
माद्रिद आणि मॅलगा यांच्यातील सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्यामुळे माद्रिदला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ३३व्या मिनिटाला रोनाल्डोनेच क्लबसाठी पहिला गोल केला. ३९व्या मिनिटाला १-० अशी आघाडी दुप्पट करण्याची चालून आलेली संधी रोनाल्डोने गमावली. मॅलगाचा गोलरक्षक कार्लोस कॅमेनीने डाव्या बाजूला उडी घेत रोनाल्डोचा पेनल्टीवर गोल करण्याचा प्रयत्न अपयशी केला.
झिनेदीन झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या माद्रिदने सातत्यपूर्ण खेळ केला होता, परंतु या वेळी त्यांना विजयाने हुलकावणी दिली. ६६व्या मिनिटाला रॉल अल्बेंटोसाने अप्रतिम गोल करून मॅलगाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
‘‘ला लिगा स्पध्रेचे जेतेपद पटकावणे आता अवघड झाले आहे, कारण आम्ही दोन गुण गमावले. अजून १३ सामने शिल्लक आहेत. जेतेपदाच्या शर्यतीतून आम्ही बाद झालो असे तुम्हाला वाटत असेल, परंतु खेळाडू आणि मला तसे वाटत नाही,’’ अशी प्रतिक्रिया झिदान यांनी दिली.
दरम्यान, व्हॅलेन्सियाने २-१ अशा फरकाने ग्रॅनडाचा पराभव करून गॅरी नेव्हिल यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. अॅटलेटिको माद्रिदला तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या व्हिलारिअलने गोलशून्य बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.