आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावांचे लक्ष पूर्ण केले. फिंच आणि मार्कस स्टॉयनिस शेवटपर्यंत खेळपट्टीवर नाबाद राहिले. फिंचने एक बाजू सांभाळून धरत स्टॉयनिसला मोकळे फटके मारण्याची मुभा दिली. त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. १८चेंडूत ५९ धावा केल्या आणि त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने २६ धावांवर डेव्हिड वॉर्नरची महत्त्वाची विकेट गमावली. त्याने १० चेंडूत ११ धावा केल्या आणि महेश तीक्षानाच्या चेंडूवर शनाकाकडे झेलबाद झाला. त्यानंतर धनंजयने मिचेल मार्शला राजपक्षेकरवी झेलबाद केले. मार्शने १७ धावा केल्या. १२ चेंडूत २३ धावा करून ग्लेन मॅक्सवेल करुणारत्नेचा बळी ठरला. भंडाराने त्याचा शानदार झेल सीमारेषेवर टिपला.
तत्पूर्वी, श्रीलंकेसाठी पथुम निसांकाने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने २६ धावा केल्या. शेवटी चरित असलंका (२५ चेंडूत ३८ धावा) आणि चमिका करुणारत्ने (सात चेंडूत १४ धावा) यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या सहा बाद १५७ पर्यंत नेली. मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल मार्श यांच्याशिवाय सर्व गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विकेट घेतल्या. मार्श आणि स्टोइनिस यांनाही महागात पाडले.
पॅट कमिन्सने शेवटच्या षटकात २० धावा दिल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल असे वाटत असताना त्याने तब्बल २१ चेंडू राखून सामना खिशात घातला.