श्वसनाचा त्रास आणि दुखापतीला झुगारून सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील आपली घोडदौड कायम राखली. त्याच वेळी पुरुषांमध्ये अॅलेक्झांडर झ्वेरेव आणि कार्लोस अल्कराझ, तर महिलांमध्ये गतविजेती अरिना सबालेन्का आणि कोको गॉफ या आघाडीच्या खेळाडूंनीही आपापले सामने जिंकताना चौथी फेरी गाठली.

हेही वाचा >>> Rinku Singh : कोण आहेत प्रिया सरोज? रिंकू सिंगबरोबरच्या साखरपुड्याच्या अफवेमुळे सर्वात तरुण खासदार चर्चेत

आपले २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जोकोविचने तिसऱ्या फेरीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या टोमास मॅकहाकला ६-१, ६-४, ६-४ असे सहज पराभूत केले. मात्र, यावेळी त्याला शरीरिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला. त्याच्या पाठीवर मोठी पट्टी लावण्यात आली होती. तसेच त्याला श्वास घेण्यासाठी त्रास झाला. त्यामुळे दुसऱ्या सेटमधील तीन गेम झाल्यानंतर त्याने वैद्याकीय ‘टाइम-आऊट’ घेतला. त्याला डॉक्टरांकडून काही गोळ्या देण्यात आल्या. तसेच त्याने दम्याचे रुग्ण वापरत असलेल्या इन्हेरलचा वापर केला. परंतु या सगळ्याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही.

हेही वाचा >>> PAK vs WI : बाबर आझमच्या मूर्खपणावर चाहते संतापले, आऊट झाल्यानंतरही वाया घालवला DRS

पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित झ्वेरेव आणि तिसऱ्या मानांकित अल्कराझनेही आगेकूच कायम राखली. जर्मनीच्या झ्वेरेवने ब्रिटनच्या जेकब फिअर्नलेचा ६-३, ६-४, ६-४ असा, तर स्पेनच्या अल्कराझने पोर्तुगालच्या नुनो बोर्गेसचा ६-२, ६-४, ६-७ (३-७), ६-२ असा पराभव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला एकेरीत अग्रमानांकित सबालेन्काला डेन्मार्कच्या बिगरमानांकित क्लारा टौसनने झुंज दिली. मात्र, सबालेन्काने महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावला. सबालेन्काने सामन्यात ७-६ (७-५), ६-४ अशी बाजी मारली. तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफने कॅनडाच्या माजी ग्रँडस्लॅम उपविजेत्या लैला फर्नांडेझचा ६-४, ६-२ असा पराभव केला. भारताच्या रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीत विजयी सलामी देताना चीनच्या शुई झेंगच्या साथीने क्रिस्टिना मलादेनोविच आणि क्रोएशियाचा इवान डोडिग या जोडीवर ६-४, ६-४ अशी मात केली.