The Hundred Tournament: एखादा खेळाडू संघासाठी किती महत्त्वाचा असू शकतो याचा प्रत्यय ‘द हंड्रेड’ स्पर्धेत पाहायला मिळाला. ओव्हल इनव्हिन्सीबल्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली. संघाचा प्रमुख फिरकीपटू रशीद खान अंतिम लढतीत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. अफगाणिस्तानकरता खेळणार असल्यामुळे रशीद अंतिम सामन्यासाठी उपलब्ध होणार नव्हता. रशीदसारख्या अनुभवी गोलंदाजाची उणीव भासणं साहजिक होतं. म्हणूनच या स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यात सातत्य राखणाऱ्या इनव्हिन्सीबल्स संघाने रशीदच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झंपाला संघात समाविष्ट केलं. इनव्हिन्सीबल्स संघाकडून आमंत्रण मिळाल्यानंतर झंपाने तब्बल ३४,००० किलोमीटरचं अंतर पार करत इंग्लंड गाठलं.
द हंड्रेड स्पर्धेच्या नियमानुसार, एखादा गोलंदाज सर्वाधिक २० चेंडूच टाकू शकतो. २० चेंडू टाकण्यासाठी झंपाने जगाच्या एका टोकातून निघून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास केला. निष्ठावंत झंपाने तातडीने प्रयाण करत लंडन गाठलं. गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम लढतीत झंपाच्या दोन विकेट्सनी सामन्याचं पारडं इनव्हिन्सीबल्सच्या बाजूने झुकवलं होतं. त्यावेळी इनव्हिन्सीबल्स संघाने सदर्न ब्रेव्ह संघावर मात करत जेतेपद पटकावलं.
झंपाने वेळेत दाखल होत संघाबरोबर सराव केला. लॉर्ड्स अर्थात क्रिकेटच्या पंढरीत झालेल्या अंतिम लढतीत इनव्हिन्सीबल्स संघाने ट्रेंट रॉकेट्स संघावर २६ धावांनी विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं. झंपाची मॅरेथॉन सफर सुफळ संपूर्ण ठरली. इनव्हिन्सीबल्स संघाने अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना १६८ धावांची मजल मारली. सलामीवीर विल जॅक्सने ४१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावांची खणखणीत खेळी साकारली. जॉर्डन कॉक्सने २८ चेंडूत ४० धावा करत त्याला चांगली साथ दिली. रॉकेट्स संघातर्फे मार्कस स्टॉइनसने २ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉकेट्स संघाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. अनुभवी जो रूट १० धावाच करू शकला. अनुभवी स्टॉइनसने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६४ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र त्याला अन्य कुणाचीही साथ मिळाली नाही. इनव्हिन्सीबल्स संघातर्फे नॅथन सोटरने ३ विकेट्स पटकावल्या. अॅडम झंपाने २० पैकी १० चेंडू निर्धाव टाकत रॉकेट्सच्या धावगतीला वेसण घातली. त्याने रॉकेट्सचा कर्णधार डेव्हिड विलीला बाद केलं.
झंपासाठी इनव्हिन्सीबल्स संघ नवीन नाही. तो इंग्लंडमध्ये सरे संघाकडूनही खेळतो. त्याला इथल्या परिस्थितीची, खेळपट्यांची जाण आहे. त्यामुळेच त्याला अंतिम लढतीसाठी बोलावलं असं प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितलं.
अंतिम लढत खेळल्यानंतर झंपा पुन्हा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. टी२० ब्लास्ट स्पर्धेत तो सरेचं प्रतिनिधित्व करणार नाही. कारण झंपाला ऑस्ट्रेलियाकडून खेळायचं आहे. ३३वर्षीय झंपा जगभरातल्या विविध टी२० लीगमध्ये खेळतो. त्याने आतापर्यंत लॉस एंजेलिस नाईट रायडर्स, मेलबर्न रेनेगेड्स, न्यू साऊथ वेल्स, ओव्हल इनव्हिन्सीबल्स, शारजा वॉरियझ, सनरायझर्स हैदराबाद, अॅडलेड स्ट्रायकर्स, दुबई कॅपिटल्स, ईस्ट टोरेन्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, जमैका तलावाला, मेलबर्न स्टार्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सिडनी थंडर, वेल्श फायर या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
झंपाने ११४ वनडेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना १९२ विकेट्स पटकावल्या आहेत. टी२० प्रकारात झंपाने १०३ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.