भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांच्या यादीतून सौरव गांगुली यांना वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी आश्चर्य व्यक्त केले. गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत रवी शास्त्री यांनी महेंद्रसिंग धोनी याचे कौतुक करताना त्याचा उल्लेख ‘दादा कर्णधार’ असा केला होता. तर आपल्या सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत कपिल देव, अजित वाडेकर आणि टायगर पतौडी यांचा समावेश केला होता. पण गांगुलीच्या नावाचे उल्लेख देखील केला नाही. रवी शास्त्री यांच्या या भूमिकेवर मोहम्मद अझरुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली.

रवी शास्त्री माजी खेळाडूंबद्दल वैयक्तिक पातळीवर काय विचार करतात याच्याशी मला देणेघेणे नाही. पण जेव्हा कर्णधारांची निवड करण्याची गोष्ट समोर येते तेव्हा कर्णधार हे देशासाठी खेळलेले आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. गांगुलीच्या कर्णधारी कामगिरीची आकडेवारी त्यांनी पाहिली नाही का? भारतीय क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या खेळाडूंचा तुम्ही अशाप्रकारे वैयक्तिक कारणासाठी अपमान करू शकत नाही, असे अझरुद्दीन यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

वाचा: रवी शास्त्रींच्या सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांच्या यादीत गांगुलीला स्थान नाही

 

महेंद्रसिंग धोनीने आपल्या कर्णधारी कारकिर्दीत भारतीय संघाला सर्वाधिक २७ कसोटी सामने जिंकून दिले आहेत. तो आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पण गांगुलीनेही भारतीय संघाला २१ कसोटी सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून दिला आहे. तर अझहर आणि विराट कोहली यांनी भारतीय संघाला १४ कसोटी सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून दिला आहे.

वाचा: सौरव गांगुलीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीवेळी गांगुली त्रिसदस्यीय सल्ला समितीमध्ये होता. पण गांगुली मुलाखतीवेळी अनुपस्थित राहिल्याने शास्त्री यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री होते. पण शास्त्रींऐवजी अनिल कुंबळे यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यानंतर शास्त्री यांनी अनेकदा गांगुलीवर उघडपणे टीका केली होती.

भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांबद्दल बोलत असताना शास्त्री यांनी धोनीचे सर्वाधिक कौतुक केले होते. भारतीय संघाचा ‘दादा कॅप्टन’ला माझा सलाम. धोनीने आपल्या कामगिरीने आजवर सर्वांचे मनं जिंकली आहेत. धोनीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखविण्याची गरजच नाही. तो नक्कीच भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनीच्या जवळपास देखील कोणीही नाही, असे शास्त्री म्हणाले होते.