जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडूंच्या समावेशामुळे भारतीय संघ अतिशय समतोल झाला असून आगामी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या विजेतेपदासाठी तोच दावेदार आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सांगितले.

सेहवाग म्हणाला की, ‘‘भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे अव्वल दर्जाचे फलंदाज, तसेच जसप्रित बुमराह, आशीष नेहरा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन यांच्यासारखे प्रभावी गोलंदाज आहेत. युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे भारतीय संघ घरच्या मैदानावर हुकमत गाजवेल. रोहित व विराट यांची जोडी चांगली जमते. जर पहिली सात-आठ षटके ही जोडी टिकली तर कोणताही संघ भारतास रोखू शकणार नाही.’’

नेहराच्या पुनरागमनाबाबत सेहवाग म्हणाला, ‘‘नेहराला सूर गवसला आहे व तो भारताला सुरुवातीला महत्त्वाचे बळी मिळवून देत आहे ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाजू आहे. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत नेहराने सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले व त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत झहीर खानने सातत्याने भारताला पहिल्या दोन-तीन विकेट्स घेत दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती. तीच जबाबदारी यंदा नेहरा पार पाडेल अशी मला खात्री आहे.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरच्या मैदानावर जरी भारत खेळत असला तरी त्यांना या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, इंग्लंड व पाकिस्तान यांच्याकडून चिवट झुंज मिळण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पाकिस्तानकडे भेदक गोलंदाजांचा समावेश आहे. विशेषत: मोहम्मद अमीर हा धोकादायक गोलंदाज मानला जातो. अनुकूल खेळपट्टी व वातावरण याचा फायदा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी निश्चितपणे घेईल,’’ असेही सेहवागने सांगितले.

भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाळा येथे आयोजित करण्याबाबत हिमाचल प्रदेशचे सरकार फारसे उत्सुक नसल्यामुळे या सामन्याचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. त्याबाबत सेहवाग म्हणाला, हा सामना तेथे होईल अशी मला आशा आहे. समजा हा सामना तेथे झाला नाही तर अन्य ठिकाणी हा सामना आयोजित केला जाईलच.