विविध मालिका आणि खेळाडूंचं अफलातून प्रदर्शन यामुळे चर्चेत असलेलं क्रिकेट जगत सध्या मात्र एका वेगळ्या परिस्थितीचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे बॉल टॅम्परिंगची. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोधात खेळात एक वेगळाच डाव रचत बॉल टॅम्परिंग म्हणजेच चेंडू कुरतडण्याची रणनिती आखली होती. खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेच याविषयीची कबुली दिली होती. ज्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर टीकेची झोड उठवण्यात आली.
एका चुकीच्या डावामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वालाच काळा डाग लागल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. तर, स्मिथ चुकला असं म्हणतही काही दिग्गजांनी आपलं मत मांडलं. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनाही या प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शिक्षाही सुनावली.
खुद्द स्मिथ आणि वॉर्नरनेही झाल्या प्रकरणी माफी मागत प्रायश्चित केल्याचं पाहायल मिळालं. आयपीएलच्या ११ हंगामासाठीसुद्धा या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. इतकं सारं असूनही क्रीडारसिकांच्या मनात सलणारा राग मात्र काही केल्या मावळण्याचं नाव घेत नाहीये. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाहून असंच म्हणावं लागेल.
वाचा : Ball Tampering: डेव्हिड वॉर्नरची टीमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून एक्झिट
झाल्या सर्व प्रकारानंतर मायदेशी परतत असताना स्मिथला जोहान्सबर्ग विमानतळावर चाहत्यांनी चिडवण्यास सुरुवात केली. ‘चीट- चीट’ असं म्हणत त्याच्या चीडखोर वृत्तीवर अनेकांनीच निशाणा साधला आणि स्टीवचं स्मित हरपलं. त्याच्याभोवती पोलिसांचा घोळका असूनही ते सुरक्षा कवच भेदून चाहत्यांचं चिडवणं त्याच्यापर्यंत पोहोचत होतं. हे सर्व वातावरण पाहता येत्या काळातही स्टीव्हला बऱ्याच अडचणींच्या सामना करावा लागणार असल्याची चिन्हं आहेत.
Incase you missed the departure of Steve Smith back to Australia, followed by chirps of "cheat". #SAvsAUS pic.twitter.com/s8z3HJmrwx
— Six Sotyelelwa (@_TheSportsJock) March 28, 2018