Tim Southee record BAN vs NZ: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सिल्हेट येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार साऊदीने पहिल्या कसोटी सामन्यात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर तो एका खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना साऊदीने ६५ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ३ चौकारही मारले. ही खेळी खेळताना त्याने त्याच्या २००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. साऊदीने आतापर्यंत एकूण ९५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १३५ डावांमध्ये ६ अर्धशतकांसह २०११ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी १६.२१ इतकी आहे. या डावात टीम साऊदीची सर्वोत्तम धावसंख्या ७७* नाबाद आहे. याशिवाय त्याने आतापर्यंत कसोटीत ३०० विकेट्स घेतल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा साऊदी हा तिसरा गोलंदाज ठरला आहे
कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करणारा कर्णधार टीम साऊदी हा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी न्यूझीलंडचे दिग्गज रिचर्ड हॅडली आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या नावावर हा विक्रम होता. हॅडलीने ८६ कसोटी सामन्यात ४३१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने किवी संघासाठी २७.१६च्या सरासरीने ३,१२४ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याच्या २ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
याशिवाय डॅनियल व्हिटोरीने ११३ कसोटी सामन्यात ३६२ विकेट्स घेत ३०.००च्या सरासरीने ४५३१ धावा केल्या आहेत. त्याने किवी संघासाठी सहा शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत. जर या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३१७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये केन विल्यमसनने आपले २९वे शतक झळकावले. त्याने २०५ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने १६ षटकात ५३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.