मुंबई:खेळाडू म्हणून देशासाठी खेळण्यापेक्षा मोठा मान असूच शकत नाही. मला हा मान यापूर्वी मिळाला आहे. मात्र, मी पूर्णपणे समाधानी नाही. मला पुन्हा भारतीय संघाकडून खेळायचे आहे. मी पुनरागमनाची आशा सोडलेली नाही, असे वक्तव्य अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने केले.

३६ वर्षीय रहाणेने आपला अखेरचा कसोटी सामना २०२३ मध्ये खेळला होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी त्याचा जवळपास दशकभरापासून विचार झालेला नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि ‘आयपीएल’मध्ये तो अजूनही चमकदार कामगिरी करत आहे.

‘‘मला भारतीय संघात पुनरागमन करायला नक्कीच आवडेल. माझ्यातील धावांची भूक अजूनही पूर्वीसारखीच आहे. तंदुरुस्तीतही मी कोणापेक्षा कमी नाही. मात्र, मी एका वेळी केवळ एका सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो. आता मी केवळ ‘आयपीएल’बाबत विचार करत आहे. भविष्यात काय होणार हे कोणालाही ठाऊक नाही,’’ असे रहाणेने ‘स्टार स्पोर्ट्स प्रेस रूम’मध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘‘मी कधीही आशा सोडणार नाही. मैदानावर असताना मी कायम माझे १०० टक्के देऊन खेळतो. ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत, त्यांच्यावर मी लक्ष केंद्रित करतो. धावा करणे माझ्या हातात आहे आणि त्या मी करत राहणार. मी सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्यात चांगली कामगिरी करत आहे. सध्या मी क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेत आहे,’’ असे मुंबईकर रहाणेने नमूद केले.

रहाणेसाठी २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा ऐतिहासिक ठरला होता. अनेक प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यानंतरही रहाणेच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात झालेली कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. मात्र, त्यानंतर फलंदाज म्हणून त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. त्यातच अन्य युवा फलंदाज पुढे आल्याने रहाणेने कसोटी संघातील स्थान गमावले.

‘‘मी ध्येय बाळगतो आणि ते गाठण्याच्या दृष्टीनेच दरदिवशी मेहनत घेतो. कोणत्याही खेळाडूसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा मान असू शकत नाही. मलाही पुन्हा देशासाठी खेळायचे आहे, भारतीय संघाची जर्सी परिधान करायची आहे. देशांतर्गत हंगाम संपल्यानंतरही मी दरदिवशी दोन-तीन तास सराव करतो. तंदुरुस्त राहण्यास मी फार महत्त्व देतो. त्यासाठी व्यायाम, खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देतो. भारतासाठी खेळणे हेच माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मेहनत घेणे मी कधीही सोडणार नाही,’’ असे रहाणे म्हणाला.

रहाणेने आतापर्यंत ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत तो सर्वाधिक यशस्वी ठरला. क्रिकेटच्या या पारंपरिक प्रारूपात रहाणेने १२ शतकांसह ५०७७ धावा केल्या आहेत.