India Won ICC Womens World Cup 2025 BCCI Announces Cash Reward : हरमनप्रीत कौरच्या फौजेने महिनाभर चालू असलेली विश्वविजयाची मोहीम फत्ते केली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान परतावून लावत भारतीय महिला संघाने पहिलंवहिलं ऐतिहासिक जेतेपद पटकावलं आहे. कपिल देव (१९८३), महेंद्रसिंग धोनी (२००७, २०११), रोहित शर्मा (२०२४) या दिग्गजांच्या मांदियाळीत आता हरमनप्रीत कौरच्या नावाचा समावेश झाला आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील डी. वाय. पाटील अकादमी स्टेडियमवर ३५०००हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने हरमनप्रीतने जेतेपदाचा करंडक उंचावला आणि देशभरातल्या क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
दरम्यान, विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर आता बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाला रोख ५१ कोटी रुपये जाहीर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या बक्षीसाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयकडून आयसीसीपेक्षा मोठं बक्षीस
बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी जाहीर केलेलं बक्षीस हे विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर आयसीसीने दिलेल्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा मोठं आहे. आयसीसीने या स्पर्धेच्या विजेत्या संघाला ४.४८ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३९.५५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या विजयानंतर देशात महिला क्रिकेटला अधिक प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
भारताचा दणदणीत विजय
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २९८ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शेफाली वर्माने ७८ चेंडूत ७ चौकार व २ षटकरांच्या मदतीने झटपट ८७ धावांची खेळी साकारली. तर, दीप्ती वर्माने अर्धशतकी खेळी (५८ चेंडूत ३ चौकार व एक षटकार) करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान, भारताचं २९९ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आप्रिकेकडून सलामीवीर लॉरा वूल्व्हडार्ट शतकी खेळी (९८ चेंडूत ११ चौकार १ षटकार) साकारली. तिला अॅनरी डर्कसेनकडून चांगली साथ मिळाली. अॅनरीने ३७ चेंडूत २ षटकार व एका चौकाराच्या सहाय्याने ३५ धावा केल्या. मात्र, इतर कुठल्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही. परिणामी भारताने हा सामना ५२ धावा राखून खिशात घातला. भारताकडून दीप्ती शर्माने ९.३ षटकात ३९ धावा देत ५ बळी टिपले. तर शेफाली वर्माने सात षटकांत ३६ धावा देत २ बळी घेत दीप्तीला चांगली साथ दिली.
