India Tour of South Africa Squad Announced : ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भेट घेऊन संघाला अंतिम रूप दिलं. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टी-२० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. उभय संघांमधील पहिला सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

बीसीसीआयने टी-२० संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवली आहे. तर के. एल. राहुलकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. राहुल एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार आणि पुढील विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या योजनेचा एक भाग असू शकतो. भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात नसतील. सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून या दोन खेळाडूंनी विश्रांती घेतली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित आणि विराटच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच द. आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही हे दोन खेळाडू नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा >> द. आफ्रिका दौऱ्यातही विराट, रोहितला विश्रांती; एकदिवसीय संघाची धुरा के. एल. राहुलकडे, टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमारकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिसीसीआयने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, रोहित आणि विराटने मर्यादित षटकांच्या खेळातून विश्रांती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार या दोन्ही खेळाडूंचा एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश केलेला नाही. तर मोहम्मद शमीच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याचा संघातील समावेश हा त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.