BCCI Complaint Against Pakistan: दुबई येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान आणि गोलंदाज हरिस रौफने आक्षेपार्ह कृती केल्याच्या विरोधात आता बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. ईमेलद्वारे तक्रार दाखल केल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. तसेच दोघांच्या आक्षेपार्ह कृतीचे व्हिडीओही सादर करण्यात आले आहेत.

दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार, रविवारी (२१ सप्टेंबर) दुबई येथे झालेल्या सामन्यात रौफ आणि फरहानने चिथावणी देणारे हातवारे केले होते. त्यांच्या या वर्तनावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे केली.

पीसीबीची सूर्यकुमार यादवविरोधात तक्रार

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आंतरराष्ट्री पॅरेंट बॉडीकडे सूर्यकुमार यादवविरोधात तक्रार दाखल केली आहे. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव आणि भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. हे खेळ भावनेच्या विरोधात आहे, असा पवित्रा पाकिस्तानकडून घेण्यात आला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध आणि बळींना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणे टाळले.

पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेतही याबद्दल भाष्य केले होते. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या बळींना हा विजय समर्पित करत असल्याचे आणि त्यामुळेच हस्तांदोलन टाळल्याचे यादवने सांगितले. पीसीबीने सूर्यकुमार यादवचे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले.

तथापि, पीसीबीने सूर्यकुमार विरोधात कधी तक्रार केली, याची माहिती मिळालेली नाही. नियमानुसार सामन्यानंतर सात दिवसांच्या आत तक्रार करावी लागते.

पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली आणि शिवम दुबेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. फरहानने बॅटची बंदूक करत गोळ्या घालण्याचे सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल झाला.

हरिस रौफने केले आक्षेपार्ह हातवारे

२१ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफ बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना स्टेडियममधील क्रिकेट चाहत्यांनी कोहली, कोहली अशा जयघोष केला. यावेळी हरिस रौफने हाताने विमान पडल्याचे हातवारे केले.