BCCI Plan For Team India ODI Captaincy: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात मोठे बदल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. आता टी-२० आणि कसोटीनंतर रोहितच्या वनडे संघाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रोहित शर्मा इथून पुढे कसोटी आणि टी-२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. मात्र, तो वनडे क्रिकेट खेळताना दिसून येईल. आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ मध्ये होणार आहे. तोपर्यंत रोहित खेळणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे रोहितच्या जागी वनडे संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रोहित शर्मानंतर ही जबाबदारी युवा खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते. या पदासाठी शुबमन गिलचं नाव चर्चेत आहे. तर सोशल मीडियावर, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टी-२० वर्ल्डकपप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटलाही रामराम करेल, असं बीसीसीआयला वाटलं होतं. पण रोहितने तसं केलं नाही. २०२७ वनडे वर्ल्डकपपर्यंत रोहित शर्मा ४० वर्षांचा होईल, त्यामुळे तो वनडे फॉरमॅट खेळणं सुरू ठेवणार का, हा मोठा प्रश्न आहे. आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. नव्या कर्णधाराला रूजू होण्यासाठी इतका कालावधी पुरेसा आहे.

मात्र, रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने HT ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ” आम्हाला असं वाटलं होतं की, चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल. पण,वनडे क्रिकेटमधील भविष्याबाबत रोहित शर्मा आणि बीसीसीआय यांच्यात कुठलीही चर्चा झालेली नाही.” रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.