कोहली-बीसीसीआय प्रकरणी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे ताशेरे

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील वाद विसंवादामुळे वाढला. त्यांच्यात पुरेसा संवाद असता, तर ही परिस्थिती अधिक उत्तम पद्धतीने हाताळली जाऊ शकली असती, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुरुवारी ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात व्यक्त केले.

‘बीसीसीआय’कडून कुणीही मला ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले नव्हते, असे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु, त्याच्या काही दिवसांपूर्वी कोहलीशी कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचे गांगुली म्हणाला होता. ‘‘पुरेशा संवादाने ही परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळणे शक्य होते. विराटने त्याची बाजू  सांगितली. आता ‘बीसीसीआय’ अध्यक्षाने त्यांची बाजू मांडणे गरजेचे आहे. कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे, हा मुळात मुद्दाच नाही. त्यांच्यात नक्की काय संभाषण झाले, हे समोर आल्याशिवाय कोणतेही तर्क लावणे योग्य नाही,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले.

आफ्रिकेतील कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ भारत संपवेल!

दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नसले, तरी आफ्रिकेतील कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपण्याची सध्याच्या भारतीय संघात क्षमता आहे, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले.

‘‘भारतीय संघाला स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. विराट सक्षम कर्णधार आहे. आफ्रिकेला घरच्या मैदानावर मात करण्याची सध्याच्या भारतीय संघात क्षमता आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.

अश्विनला दुखावल्याचा आनंद!

शास्त्री यांनी २०१९मध्ये सिडनी येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर कुलदीप यादवला परदेशातील भारताचा प्रमुख फिरकीपटू असे संबोधले होते. मात्र, त्यामुळे भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन दुखावला गेला. या गोष्टीचा मला आनंद असल्याचे शास्त्री म्हणाले. ‘‘अश्विन सिडनी कसोटीत खेळला नाही आणि कुलदीपने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला संधी देणे योग्य होते. अश्विन दुखावला गेला असेल, तर मला त्याचा आनंदच आहे. त्याच्या खेळात त्यामुळे वेगळेपणा आला. उगाच कोणाची स्तुती करणे हे माझे काम नाही. प्रशिक्षकाने तुम्हाला आव्हान दिल्यास तुम्ही रडत घरी परतणार का? खेळाडू म्हणून ते आव्हान स्वीकारत प्रशिक्षकाला चुकीचे ठरवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे,’’ असे शास्त्री म्हणाले.

कोहलीने खेळावर लक्ष केंद्रित करावे -कनेरिया

नवी दिल्ली : कोहली आणि ‘बीसीसीआय’ अध्यक्ष गांगुली यांच्यातील विसंवादाबाबत मागील काही दिवस चर्चा होत आहे. मात्र, कोहलीने गांगुलीबाबत भाष्य करून वाद उकरण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने त्याला सुनावले.