BCCI Moved to ICC in Dubai to Get Back Asia Cup : महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिलावहिला विश्वचषक उंचावला आहे. या विजयासह गेल्या तीन दशकांपासूनची भारतीय क्रिकेटरसिकांची प्रतीक्षा संपली. भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक उंचावला आहे. या विजयानंतर देशभर जल्लोष केला जात आहे. महिलांनी एकदिवसीय विश्चचषक पटकावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकाकडे लक्ष वळवलं आहे. भारतीय संघाने जिंकलेला आशिया चषक भारतात आणण्यासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. यासाठी बीसीसीआयचे अधिकारी दुबईला रवाना झाले आहेत. दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक होत आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अधिकारी आशिया चषकाचा मुद्दा उपस्थित करतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी मुंबई विमानतळावर आयएएनएसशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की “सद्यस्थितीत विजयी मिरवणूक आयोजित करण्याची बीसीसीआयची कोणतीही योजना नाही. मी सध्या आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईला जात आहे. बीसीसीआयचे इतरही काही अधिकारी दुबईला जात आहेत. तिथून परतल्यानंतर पुढची योजना तयार करू. आता दुबईत आयसीसीची बैठक होणार आहे, त्या बैठकीत आम्ही आशिया चषकाचा प्रश्न आयसीसीसमोर मांडणार आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही जिंकलेला चषक आदरासह आम्हाला परत मिळेल.”
सप्टेंबर महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी भारत व पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी व दोन चेंडू राखून मात केली आणि आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेत दमदार फलंदाजी, काटेकोर गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखलं. मात्र, या विजयानंतर भारतीय संघाला आशिया चषकाशिवाय भारतात परतावं लागलं. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे चषक घेऊन पाकिस्तानला निघून गेले.
आशिया चषक भारतात कधी परतणार?
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानमधील नेते व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पाकिस्तानला निघून गेले. ती ट्रॉफी मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयला दिली नाही. त्यामुळे हा वाद आणखी वाढला. त्यामुळे बीसीसीआय ४ नोव्हेंबरला हा मुद्दा आयसीसीसमोर मांडणार आहे.
