मुंबई : भारतीय महिला संघ विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संपवेल, अशी आशा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष देवजीत सैकिया यांनी रविवारी व्यक्त केली.
भारतीय महिला संघाला यंदा विश्वचषक स्पर्धा मायदेशात खेळण्याची संधी मिळणार असून स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल. भारतीय महिला संघाने यापूर्वी १२ विश्वचषक स्पर्धांत सहभाग नोंदवला आहे. मात्र, त्यांना अद्याप एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही.
‘‘यंदा महिला विश्वचषक स्पर्धेला गुवाहाटी येथून सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पुरुष विश्वचषक स्पर्धेचे (२०२३) सराव सामने झाले होते. मात्र, आता महिला विश्वचषकातील भारत विरुद्ध श्रीलंका हा सलामीचा सामना गुवाहाटी येथे होणे ही खूपच खास गोष्ट आहे,’’ असे सैकिया म्हणाले. सैकिया हे आसाम संघाचे माजी रणजीपटू आहेत.
‘‘घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आपल्या भारतीय संघाला चाहत्यांचा मोठा पाठिंबा लाभेल यात शंका नाही. भारतीय संघाने अलीकडेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. भारतीय क्रिकेटसाठी हे मोठे यश होते,’’ असेही सैकिया यांनी सांगितले.
भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. निर्णायक तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४१२ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारताने दमदार प्रत्युत्तर दिले. स्मृती मनधानाच्या वेगवान शतकाच्या जोरावर भारताने ३६९ धावा केल्या. अखेरीस पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाने दिलेला लढा उल्लेखनीय ठरला.
‘‘ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली असली, तरी भारताने दाखवलेल्या जिद्दीचेही कौतुक झाले पाहिजे. ही मालिका अत्यंत चुरशीची झाली. ऑस्ट्रेलियन संघाचा दर्जा सर्वांना ठाऊक आहे, पण भारतीय संघाचा दर्जाही दिवसेंदिवस उंचावत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात पूर्वीइतकी तफावत उरलेली नाही. भारतीय संघाने अद्याप विश्वविजेतेपद मिळवले नसले, तरी यंदा त्यांना ही प्रतीक्षा संपविण्याची सुवर्णसंधी आहे,’’ असेही सैकिया म्हणाले.
‘कामगिरीबाबत समाधानी’
ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली असली, तरी भारतीय महिला संघाच्या एकंदर कामगिरीबाबत उपकर्णधार स्मृती मनधाना समाधानी होती. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाची चांगली तयारी झाल्याचे मनधानाने नमूद केले. ‘‘ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना नेहमीच कसोटी लागते आणि यंदाची मालिकाही यापेक्षा वेगळी नव्हती.
आमच्या खेळात काय उणिवा आहेत, हे तपासून घेण्यासाठी, तसेच योग्य संघरचना आणि खेळाडूंची निवड, या दृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण होती. आम्ही क्षेत्ररक्षणात बरीच सुधारणा केली आहे. परंतु सातत्य गरजेचे आहे. काही सामन्यांत आम्ही फारच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो, तर काही सामन्यांत आम्हाला तितकीशी चांगली कामगिरी करता येत नाही. यात आता सुधारणा आवश्यक आहे,’’ असे मनधाना म्हणाली.