भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आयर्लंडबरोबर होणाऱ्या आगामी कसोटी सामन्यात सहभागी होणार नाहीये. बीसीसीआयने त्याला इंग्लंडमध्ये होणाऱ्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विराट सरे या संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.

याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी विराटवर आणि बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यांनी ९ मे रोजी ट्विट केले की बीसीसीआयने कशाला प्राधान्य द्यायचे हे बहुतेक ठरवलेले दिसते. पहिले विराटने काऊंटीपेक्षा आयपीएल प्राधान्य दिले. तर भारत-आयर्लंड कसोटी सामना नियोजित असताना बीसीसीआयने विराटला आता काऊंटी खेळण्यास परवानगी दिली. वा!. त्यांच्या या ट्विटमध्ये अफगाणिस्तानच्या संघाचा उल्लेख नसला तरी बीसीसीआयच्या या निर्णय म्हणजे त्या संघाचा अपमान आहे, असे थरूर यांनी सुचवले.

थरूर यांच्या या खोचक ट्विटला सोशल मीडियातून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले. दरम्यान, बीसीसीआयनेही यास सडेतोड उत्तर दिले.

बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले की १९३२ साली लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेइतकेच महत्व आम्ही आयर्लंडबरोबरच्या मालिकेला देत आहोत. विराट हा चांगला आणि सक्षम खेळाडू आहे. अशा खेळाडूला काऊंटी क्रिकेटसाठी कसोटी क्रिककेत न खेळवणे हा प्रतिस्पर्धी संघाचा अपमान नाही. कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेतला जातो. आगामी इंग्लंड दौरा विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या निर्णयामागील विचार लक्षात घ्यावा, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

याशिवाय, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही थरूर यांना उत्तर दिले. ते म्हणाले की विराट वगळता इतर सर्व महत्वाचे खेळाडू ही कसोटी खेळणार आहेत. फक्त विराट हा सामना खेळणार नाही. आणि त्यामागचे कारणही चांगले आहे. विराटच्या काऊंटीच्या अनुभवाचा आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी फायदाच होणार आहे. इंग्लंडमधील भारताच्या कामगिरीबाबत तो खूप जागरूक आहे. त्या वातावरणात चांगली कामगिरी करण्यासाठी तो स्वतःही उत्सुक आहे. आणि भारताला मालिका जिंकण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे.