मुंबई :आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आणि त्यापूर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज, शनिवारी निवड केली जाणार असून यावेळी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या उपलब्धतेकडे सर्वांचे लक्ष असेल.

निवड समितीची सकाळी बैठक होणार असून त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे दुपारी १२.३०च्या सुमारास पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली जाईल. या पत्रकार परिषदेला निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा >>> श्वसनाचा त्रास, दुखापतीला झुगारून जोकोविचची घोडदौड; अल्कराझ, सबालेन्का यांचीही चौथ्या फेरीत धडक

भारतीय संघाची निवड करताना आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याला या कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत चिंता निर्माण झाली. बुमराला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्याच्या तंदुरुस्तीकडे बंगळूरु येथील ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलंसमधील फिजिओ लक्ष ठेवून आहेत. परंतु चॅम्पियन्स करंडकासाठी तो उपलब्ध असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच २३ वर्षीय सलामीवीर यशस्वी जैस्वालला एकदिवसीय संघात प्रथमच संधी मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. जैस्वालने गेल्या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्याला एकदिवसीय संघातही समाविष्ट केले जाण्याची चर्चा सुरू आहे. रोहित, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. राहुल यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणे अपेक्षित असून दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा आहे. तसेच लयीत असलेल्या करूण नायरचा विचार होतो का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीत कुलदीप यादवच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे. त्याने आता सरावाला सुरुवात केली असली, तरी तो खेळण्यासाठी उपलब्ध नसल्यास वरूण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकीपटूंपैकी एकाला संधी मिळू शकेल.