भारत सध्या करोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) मदतीसाठी पुढे आले आहे. बीसीसीआयने १० लीटरचे २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत हे कॉन्सन्ट्रेटर देशभरातील गरजू लोकांना देण्यात येतील.

बीसीसीआयपूर्वी विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शिखर धवन यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली आहे. भारतात दररोज २ लाखाहून अधिक करोनाची प्रकरणे समोर येत आहेत.

कृत्रिम ऑक्सिजन घेत स्वयंपाक करणाऱ्या ‘आई’ला पाहून सेहवागचे डोळे पाणावले

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, “करोनाविरूद्धच्या लढाईत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा देणार्‍या लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि ते अजूनही या व्हायरसविरूद्ध लढाई लढत आहेत. ते आपल्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बोर्डाने नेहमीच आरोग्य आणि सुरक्षिततेला प्रथम स्थान दिले आहे आणि आम्ही वचनबद्ध आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या मदतीमुळे लोकांना दिलासा मिळेल.

 

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ”करोनाविरूद्धच्या या लढाईत आम्ही सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. बीसीसीआय संकटाच्या वेळी वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता समजून घेते. अशा प्रयत्नांमुळे देशातील मागणी-पुरवठ्यातील तफावत कमी होण्यास मदत होईल. सध्या लसीकरण मोहीम चालू आहे. मी सर्व पात्र लोकांना लस घेण्याचे आवाहन करतो.”

‘‘हार्दिक पंड्याऐवजी शार्दूल ठाकूरला ऑलराउंडर म्हणून संघात स्थान मिळायला हवे”