हरारे स्पोर्ट्स क्लब इथे सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये झिम्बाब्वेच्या बेन करनने पहिलंवहिलं शतक झळकावलं. या शतकाच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. करन कुटुंबीयांपैकी शतक झळकावणारा बेन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. वडील आणि तीन मुलं सगळेच क्रिकेटपटू असं हे अनोखं कुटुंब आहे.

बेनचे वडील केव्हिन हे झिम्बाब्वेचे माजी खेळाडू. ११ सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय शतक नाही. त्यांना तीन मुलं- बेन, सॅम आणि टॉम. सॅम आणि टॉम इंग्लंडसाठी खेळतात. इंग्लंडकडून नियमित खेळत असल्याने तसंच आयपीएलचा भाग असल्याने सॅम लोकप्रिय आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजी, उपयुक्त फटकेबाजी करणारा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक ही सॅमची ओळख आहे. पिंचहिंटर म्हणूनही त्याला पाठवलं जातं. फलंदाजीत बढती मिळूनही सॅमच्या नावावर शतक नाही. भारताविरुद्ध ७८ धावांची खेळी सर्वोत्तम आहे.

टॉम हा वेगवान गोलंदाज आहे. मात्र गरज पडल्यास तोही फलंदाजी करू शकतो. टॉमने २ टेस्ट, २८ वनडे आणि ३० टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण यांचा तिसरा भाऊ बेन हा इंग्लंडऐवजी झिम्बाब्वेकडून खेळतो. २९वर्षीय बेनने गेल्या वर्षी अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. तेव्हापासून झिम्बाब्वेचा सलामीवीर म्हणून तो खेळतो आहे. पदार्पणाच्या लढतीतच त्याने ६८ आणि ४१ धावांची आश्वासक खेळी केली होती. आठव्या कसोटीत बेनचं कसोटी शतकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. १५ चौकारांसह १२१ धावांची खेळी करून बेन तंबूत परतला.

बेन करन २०२२ पर्यंत काऊंटी क्रिकेट संघ नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळला आहे, परंतु त्यानंतर तो झिम्बाब्वेला गेला. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी चमकदार कामगिरी केली आहे. प्रो-५० चॅम्पियनशिप २०२४/२५ आणि लोगान कप २०२४/२५ प्रथम श्रेणी टूर्नामेंटमध्ये तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे त्याची झिम्बाब्वे राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.

अफगाणिस्तानला १२७ धावांत गुंडाळल्यानंतर झिम्बाब्वेने बेनच्या शतकाच्या बळावर तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे.