Delhi Capitals, Axar Patel: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधीच मोठ्या घडामोडी घडायला सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी हंगामात अक्षर पटेलकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. त्यामुळे तो केवळ अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसू शकतो.
येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेत ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात भारत, पाकिस्तानसह, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, युएई, ओमान आणि हाँगकाँग या ८ संघांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात अक्षर पटेलचा देखील समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल याआधी भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. मात्र ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.
न्यूज २४ ने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला नवा कर्णधार मिळू शकतो. तो खेळाडू म्हणून संघात राहणार, पण त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाणार नाही. गेल्या हंगामात अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सत्रात दमदार कामगिरी केली होती. या संघाने ८ पैकी ६ सामने जिंकले होते. पण दुसऱ्या सत्रात या संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. दिल्लीला १४ पैकी ७ सामने जिंकले होते. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदान मानल्या जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. आगामी हंगामासाठी केएल राहुल, फाफ डू प्लेसिस आणि ट्रिस्टन स्टब्स ही नावं कर्णधारपदासाठी तुफान चर्चेत आहे. आता ही जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अक्षर पटेलची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
अक्षर पटेलकडे आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. गेल्या हंगामात त्याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली होती. आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. १२ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने २६३ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले होते.