ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. या स्पर्धेने सर्वच विक्रम मोडून काढले आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामन्याने पुरुषांच्या टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या स्पर्धेनंतर आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ८ संघांचा केला जात होता. मात्र २०२९ वर्ल्डकप स्पर्धेत संघांची संख्या वाढवली जाणार आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ८ ऐवजी १० संघांना प्रवेश दिला जाणार आहे. ७ नोव्हेंबरला झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला आहे.
महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. महिला क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२९ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून लागू केला जाणार आहे.
आयसीसीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर पुढील वर्ल्डकप स्पर्धेत ८ ऐवजी १० संघांचा समावेश करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भारतात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेने सर्वाच विक्रम मोडून काढले आहेत. अंतिम सामना हा आतापर्यंतचा महिलांचा सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला. अंतिम सामना ५० कोटी लोकांनी पाहिला.
आयसीसीच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडू शकते. आयसीसी नेहमीच महिला क्रिकेटला पुढे करण्यासाठी प्रयत्नशील असते. संघांची संख्या वाढल्यानंतर इतर संघांना देखील भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघासोबत मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या संघांनी महिला वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पण पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या संघांना आपली छाप सोडता आलेली नाही. संघांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर सामन्यांच्या संख्येत देखील वाढ होईल.
