आपला रिची बेनॉ गेला. हो हो आपलाच. लांब ऑस्ट्रेलियात असणारा एक ऑस्ट्रेलिअन असला तरी आपलाच तो. क्रिकेटच नातं रक्तापेक्षा घट्ट असत.
बेनॉ गेला हे ऐकता क्षणी गलबलून आले. तो कॉमेंट्रीला असला की मॅच डोळ्यांनी बघायची गरज नव्हती. डोळे मिटून ऐकत बसायचे. त्याने क्रिकेट रसिकांच्या तीन पिढ़या घडवल्या त्यांचे भरण पोषण केले. छोट्या ट्रेनने जंगलातून प्रवास करताना जसे बाबा आपल्या मुलांना पशू, पक्षी ,डोंगर, झरे दाखवत दाखवत जंगलाची मजा कशी घ्यायची हे सांगतात  तसच बेनॉने क्रिकेटच्या पन्नास वर्षाच्या समालोचनातून क्रिकेटच्या सौंदर्य स्थळांची नितांत सुंदर सहल घडवली.
त्याच्या बोलण्यात सूर्योदयाची जादू होती. ‘मॉर्निंग एव्री वन.ब्यूटीफुल डे एट द Waca’ म्हटलं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा दिशा उजळून झुंझुमुंजु झाल्यासारख वाटे. ऑस्ट्रेलियाची मॅच आपल्याकडे पहाटे सुरु होते. पहाटे पाचला बेनॉचा आवाज ऎकला की प्रभातवंदंन ची गरज वाटायची नाही.
अस काय होत बेनॉच्या समालोचनात? का एवढी भुरळ पडली त्याने? त्याला अनेक कारणे आहेत.
त्यातल सर्वात पहिल कारण म्हणजे त्याने ओळखलेली क्रिकेट खेळाची लय आणि त्या प्रमाणे घडवलेली समालोचनाची शैली. क्रिकेट खेळाचा आत्मा त्याच्या विलंबित लयीत आहे. दोन चेंडू मध्ये बराच वेळ असतो. दर एक तासानी ड्रिंक्स करता तर दोन तासानी लंच आणि टी करता मोठी विश्रांति असते. एक सामना पाच दिवस चालतो. बरेचदा फलंदाजाला खेळपट्टीवर अस्तित्वाची लढाई खेळावी लागते त्यामुळे अनेक चेंडूवर धावा होत नाहीत. अशा संथ पण खिळवून ठेवणाऱ्या खेळाचे समालोचन तितकेच संयत झाले तर खेळाच्या मूळ स्वभावाला छेद जाणार नाही हे तो पूर्णपणे जाणून होता. आपल्याकडे क्रिकेटच्या लाइव्ह कॉमेंट्रीला धावतं वर्णन असा शब्द आहे. पण बेनॉ वर्णन करताना कधीही धावला नाही. जी गोष्ट टीव्ही वर दिसतेय तीच सांगून मी प्रेक्षकांच्या बुद्धिचा अपमान का करू अस तो म्हणत असे. म्हणून खेळाचे अंतरंग सांगण्याकड़े त्याचा कल होता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आवाजाचा संयत पोत. चॅनेल नाइनने भिन्न स्वभावाचे समालोचक बॉक्स मध्ये बसवले. कायम फसफसणारा बिल लॉरी, कायम उत्तेजित टोनी ग्रेग, निष्ठुर आणि कुणाची पर्वा न करणारा इयन चैपल, अतिशय गूढ़ आवाजाचा कीथ स्टैकपोल. या सर्वामध्ये  कमेंट्री बॉक्सचे संतुलन ठेवणारा असा संयत आवाजाचा पोत आणि मितभाष्य म्हणजे बेनॉ.
विकेट पडली तरी ‘डन हिम’अगदी वर्ल्ड कप ची फाइनल जिंकली तरी ‘thats ईट’एव्हढच्. काहीही उत्तम पाहिल की “मारव्ल्लस”एव्हढचं. सगळा कौल त्यातली प्रोसेस समजून सांगण्याकड़े.
‘स’ ला ‘श’ म्हंण्याची लक़ब सुद्धहा श्रोत्याला खटकली नाही उलट गोडच् वाटली. उदा.’जष्ट फाइव मिनट्स फॉर टी’ किंवा “ही शेड इट्स गुड’. स आणि श च्या सीमा रेषेवरील उच्चार.
केरी पैकरने बेनॉ हाच चैनल ९ चा चेहरा असेल हे ठरवून त्याचे वेगळे पण जपले. त्याला खास क्रीम रंगाचे जैकेट दिले. तीच त्याची ओळख बनली. पांढऱ्या शुभ्र केसांनी त्याच्या मुळच्या प्रगल्भतेला नवीन परिमाण दिले. किंचित डोळ्यात तिरळेपणा ही त्याची खूण होती.
स्वतः अव्वल दर्जाचा लेग स्पिनर असल्याने लेग स्पिन आणि लेग स्पिनरवर त्याचा अफाट जीव होता. शेन वाँर्नने गैटिंगला शतकातील सर्वोत्तम चेंडू टाकला तेव्हा माइक वर बेनॉ होता हा परमेश्वराने घडवून आणलेला योग होता.
आपल्या दुर्दैवाने तो भारतात फारसा आला नाही. प्रदूषणाला तो घाबरायचा. गावस्कर ,सचिन आणि कपिल त्याचे लाडके खेळाडू. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघात पहिल्या अकरात गावस्कर आणि सचिन होते. ब्रैडमैनला खेळताना पहिलेला बेनॉ ब्रैडमैन नंतर सचिनच अस अत्यंत प्रेमाने म्हणायचा. त्यात त्याच्यातला ऑस्ट्रेलियन कधीही आड़ आला नाही. कारण त्याचं पहिल प्रेम क्रिकेटवर होत त्यामुळे नि:स्पृहता त्याला वेगळी जोपासावी लागली नाही.
फिल ह्यूज गेला तेव्हा ‘रेस्ट इन पीस सन’अस माइक वरुन बेनॉ म्हणाला. ते अगदी योग्य होते कारण क्रिकेटवर माया असणारी सगळीच त्याची मुलं होती आणि तो सगळ्यांचा सर्वात आदरणीय आणि लाड़का पितामह होता.
गुरुवार रात्री बेनॉ झोपायला गेला तो ‘सरळ निघूनच्’गेला. त्याच्याच लाडक्या फ्लिपरसारखा.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)