नवी दिल्ली : सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताचा बॅडिमटनपटू एच.एस. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी मजल मारली आहे. प्रणॉयच्या क्रमवारीत दोन क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. किदम्बी श्रीकांतचेही स्थान दोन क्रमांकांनी सुधारले असून, तो आता १२व्या स्थानावर आला आहे. पहिल्या १० जणांमध्ये केवळ लक्ष्य सेनला स्थान मिळाले आहे. तो नवव्या स्थानावर आहे.

जागतिक अजिंक्यपद आणि जपान खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतरही पी. व्ही. सिंधूने ताज्या क्रमवारीत सातवे स्थान टिकवले आहे. लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने तीन स्थानांनी आगेकूच करीत ३०व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. दुहेरीत राष्ट्रकुल विजेतेपदानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांचे आठवे स्थान कायम राहिले आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन, सिक्की रेड्डी २८व्या स्थानावर आहेत. मिश्र दुहेरीत तनिशा क्रॅस्टो-इशान भटनागर ३३व्या स्थानावर असून, कारकीर्दीतील ही त्यांची सर्वोत्तम क्रमवारीतील कामगिरी आहे.