करोनामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम युएईत पोहोचली आहे. मात्र विदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात होतं. आता हा संभ्रम दूर झाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या २० तर इंग्लंडच्या १४ खेळाडूंना संधी मिळाली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला याबाबतची माहिती दिल्याची बातमी क्रिकबजने दिली आहे. आयपीएलचे सीओओ हेमंग अमीन यांनी सर्व संघ व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली आहे. आता खेळाडूंवर खेळायचं की नाही?, हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापक विदेशी खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना खेळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्समधील स्टीव स्मिथ आणि मार्क स्टोयनिस या स्पर्धेत खेळणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना परवानगी दिल्याने आता पाकिस्तान दौरा होणं कठीण आहे. इंगंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यात दोन टी२० सामने खेळणार आहे. हे दोन सामने १३ आणि १४ ऑक्टोबरला आहेत. तर न्यूझीलंडचा संघही प्रमुख खेळाडू व्यतिरिक्त पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. याबाबतची माहिती न्यूझीलंड बोर्डाने दिली आहे.
UAE मध्ये रोहितच्या ‘मुंबई इंडियन्स’ला मिळाली ‘ती’ खास सुविधा; धोनीचा संघ मात्र मुकला
पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४वे सत्र ४ मे रोजी तहकूब करण्यात आले. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्या स्थानावर आहे.