मुंबईकर रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच फॉर्मात आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला येणाऱ्या रोहितने २०१९ मध्ये कसोटीतही सलामीचं स्थान पटकावलं. २०१९ विश्वच।क स्पर्धेतली पाच शतकं आणि इतर स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी करत रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. २०२० न्यूझीलंड दौऱ्यात अखेरचा टी-२० सामना खेळताना रोहितला दुखापत झाली व इतर सामन्यांसाठी त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. तरीही रोहितला वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत.

“न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासाठी मी उत्सुक होतो, परंतु दुर्दैवाने मला दुखापत झाली आणि संघाबाहेर जावं लागलं. पण मी ऑस्ट्रेलियात जाऊस कसोटी मालिका खेळण्यासाठी उत्सुक आहे. स्मिथ आणि वॉर्नर हे दोन खेळाडू संघात असताना ऑस्ट्रेलियात खेळणं हे आव्हानात्मक आहे.” दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत आश्वासक कामगिरी केल्यानंतर आपल्याला अधिक आत्मविश्वास आल्याचंही रोहितने स्पष्ट केलं. तो इंडिया टुडे वृत्तसमुहाशी बोलत होता.

अवश्य वाचा – इंग्लंडमध्ये ‘या’ गोलंदाजाचा सामना करणं कठीण – अजिंक्य रहाणे

२०१८ सालपासून भारतीय संघ व्यवस्थापनाने मला कसोटीत सलामीला येण्याची संधी मिळू शकते असे संकेत दिले होते. त्यावेळपासून मी यासाठी तयारी करत होतो. ड्रेसिंग रुममध्ये बसून सामना पाहणं फारसं चांगलं नसतं, कोणत्याही खेळाडूला ते आवडत नाही. त्यामुळे मला ज्यावेळी संधी मिळाली, त्या संधीचा मी पूरेपूर लाभ घेतला. काही तांत्रिक गोष्टींवर काम करण्याची गरज होती, पण ती सरावाने मी केली असंही रोहित म्हणाला. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे.