भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे. तसेच टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.

दोन फिरकी गोलंदाज खेळवायला हवे होते असं टीकाकार म्हणत होते, या प्रश्नावर बोलताना विराट कोहलीनं मासलेवाईक उत्तर दिलं. विराट म्हणाला, “अनेकांच्या नोकऱ्या त्या कामासाठी असतात की आम्ही काय करावं करू नये. त्यांना त्यांचं काम करू द्यावं पण आम्ही अशा चर्चांकडे लक्ष देत नाही. ड्रेसिंग रुममध्ये आम्ही काय बोलतो, ठरवतो हे महत्त्वाचं असतं आणि आम्ही त्यावरच भर देतो.” या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवाल होता.

चौथ्या कसोटीत भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले. आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे. तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.