चॅम्पियन्स लीग फुटबॉल :- डग्लस कोस्टाने दुखापतग्रस्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलमुळे युव्हेंटसने लोकोमोटिव्ह मॉस्को संघाचा २-१ असा पाडाव करत चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. त्याचबरोबर बायर्न म्युनिकनेही बाद फेरीत प्रवेश केला आहे.

रॉड्रिगोची हॅट्ट्रिक आणि चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात केलेल्या सर्वात वेगवान दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने बुधवारी गालाटासारेचा ६-० असा धुव्वा उडवला. १८ वर्षीय रॉड्रिगोने पहिली सहा मिनिटे आणि १४ सेकंदांतच दोन गोल झळकावले. त्यानंतर सर्जियो रामोसने १४व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत रेयाल माद्रिदची आघाडी ३-० अशी वाढवली. करीम बेंझेमाने ४५व्या आणि ८१व्या मिनिटाला दोन गोलची भर घालत रेयालला ५-० असे आघाडीवर आणले. त्यानंतर ९०व्या मिनिटाला रॉड्रिगोने हॅट्ट्रिक सादर करत रेयालला विजय मिळवून दिला.

मॉरो इकार्डी याने पहिल्या सत्रात केलेला एकमेव गोल पॅरिस सेंट-जर्मेनच्या विजयात मोलाचा ठरला. त्यामुळे पॅरिस सेंट-जर्मेन संघाने पार्क डेस प्रिन्सेसवर १-० अशी मात केली. रॉबर्ट लेव्हानडोव्हस्की (६९व्या मिनिटाला) आणि इव्हान पेरिसिक (८९व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे बायर्न म्युनिकने ऑलिम्पियाकोसचा २-० असा पाडाव करत बाद फेरीत आगेकूच केली.

मँचेस्टर सिटीची अंतिम १६ जणांमध्ये प्रवेश करण्याची संधी बुधवारी हुकली. मँचेस्टर सिटीला अ‍ॅटलांटाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. रहीम स्टर्लिगने सातव्या मिनिटालाच मँचेस्टर सिटीला आघाडीवर आणले होते, पण मारियो पॅसलिक याने पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना हेडरद्वारे गोल करत अ‍ॅटलांटाला बरोबरी मिळवून दिली. क गटात मँचेस्टर सिटीचे १० गुण झाले आहेत.