महाबलीपूरम : युवा ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश असलेल्या खुल्या विभागातील भारतीय ‘ब’ संघाने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. तसेच महिला विभागात १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या भारतीय ‘अ’ संघाला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मंगळवारी झालेल्या ११व्या फेरीत त्यांनी अमेरिकेकडून पराभव पत्करला.

खुल्या विभागात, अखेरच्या दिवशी भारतीय ‘ब’ संघाने जर्मनीवर ३-१ अशी मात केली. त्यांच्याकडून निहाल सरिन आणि नागपूरच्या रौनक साधवानीने निर्णायक विजयांची नोंद केली. पहिल्या पटावरील डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखले. भारतीय ‘ब’ संघात गुकेश, प्रज्ञानंद आणि साधवानी या १६ वर्षीय त्रिकुटासह, १८ वर्षीय सरिन आणि २९ वर्षीय बी. अधिबन यांचा समावेश होता. या संघाने ११ पैकी आठ लढती जिंकल्या. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाला यंदा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यांनी अखेरच्या फेरीत अग्रमानांकित अमेरिकेला २-२ असे बरोबरीत रोखले. मात्र, त्यांना स्पर्धेअंती चौथे स्थान मिळाले. तसेच  ‘क’ संघाचा कझास्तानविरुद्धचा अखेरचा सामनाही २-२ असा बरोबरीत संपला.

महिला विभागातील भारतीय ‘अ’ संघासाठी ऑलिम्पियाडचा अखेरचा दिवस निराशाजनक ठरला. १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या या संघाने अमेरिकेकडून १-३ अशी हार पत्करली. तिसऱ्या स्थानासाठी भारतीय ‘अ’ संघ आणि अमेरिकेमध्ये १७-१७ गुणांची बरोबरी होती. मात्र, टायब्रेकरमधील सरस गुणफरकामुळे भारतीय संघाला कांस्यपदक जिंकले. भारतीय ‘ब’ संघाने  स्लोव्हाकियाला २-२ असे बरोबरीत रोखले, तर ‘क’ संघाचा कझाकस्तानने पराभव केला.

उझबेकिस्तान, युक्रेनला जेतेपद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुल्या आणि महिला विभागात अनुक्रमे उझबेकिस्तान आणि युक्रेन यांनी जेतेपदे पटकावली. १३व्या मानांकित उझबेकिस्तानने अखेरच्या फेरीत  नेदरलँड्सला २.५-१.५ असे नमवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी या स्पर्धेत अपराजित राहताना एकूण १९ गुण मिळवले. अर्मेनियाने दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक पटकावले. महिला विभागात युद्धाशी झुंजणाऱ्या युक्रेनने १८ गुणांसह सुवर्णपदक कमावले. जॉर्जियाच्या संघाने रौप्यपदक जिंकले.