इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ५४ धावा केल्या होत्या. त्या धावसंख्येवरून भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिलं षटक टाकायला आलेल्या मोईन अलीने षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत केवळ एक धाव दिली होती. शेवटच्या चेंडू खेळून काढण्याचा पुजाराचा विचार होता. तो चेंडू खेळण्यासाठी पुढे आला अन चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खेळाडूकडे गेला. पुजारा क्रीजच्या पुढे असल्याचं पाहून फिल्डरने चेंडू पटकन किपरकडे दिला. पुजारा क्रीजमध्ये बॅट टेकवणार इतक्यात त्याची बॅट मैदानावर अडकली आणि त्यामुळे पुजारा बाद झाला.
इंग्लंडविरूद्ध पुजारा तिसऱ्यांदा धावबाद झाला. सर्वात आधी २०१२मध्ये कोलकाताच्या मैदानावर तो धावबाद झाला होता. त्यावेळी त्याने २२ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१८मध्ये पुजारा लॉर्ड्सच्या मैदानावर २५ चेंडूत १ धाव काढून धावबाद झाला होता. त्यानंतर आज २३ चेंडूत ७ धावा काढून पुजारा विचित्र पद्धतीने बाद झाला.
Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…
दरम्यान, भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स (०), डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (९) आणि कर्णधार जो रूट (६) स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. मोईन अली (६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.