वृत्तसंस्था, सेंट-एटिएन

अगदी अखेरच्या टप्प्यावर अर्जेंटिनाने नोंदवलेल्या गोलचा निषेध करण्यासाठी मोरोक्कोच्या चाहत्यांनी मैदानात घुसखोरी केल्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील उभय संघांतील फुटबॉल सामना जवळपास दोन तास स्थगित करावा लागला. सामना पुन्हा सुरू होण्यापूर्वी ‘व्हीएआर’ने अर्जेंटिनाचा गोल ‘ऑफ-साइड’मुळे रद्द केला. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत अर्जेंटिनाला मोरोक्कोकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.

मोरोक्कोचा संघ या सामन्यात सुस्थितीत होता. त्यांच्याकडे दोन गोलची आघाडी होती. मात्र, अर्जेंटिनाने पुनरागमन करताना मोरोक्कोची आघाडी कमी केली. नंतर तब्बल १९ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. यातील १६व्या मिनिटाला क्रिस्टियन मेदिनाने गोल नोंदवत अर्जेंटिनाला २-२ अशी बरोबरी करून दिली. मात्र, या गोलचा निषेध करण्यासाठी मोरोक्कोचे चाहते मैदानात घुसले. यावेळी सुरक्षारक्षकांना त्यांना अडवावे लागले. तसेच अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या दिशेने बाटल्या आणि कपही फेकण्यात आले. त्यामुळे पंचांना खेळ थांबवावा लागला.

हेही वाचा >>>Olympics Opening Ceremony Parade Order: नदीवर होणार उद्घाटन सोहळा, परेडमध्ये नेहमी ग्रीसचे खेळाडू पहिले का? भारत कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी पंचांनी सामना संपवल्याचे वाटल्याने खेळाडू मैदानाबाहेर पडले. ‘फिफा’नेही आपल्या संकेतस्थळावर सामना संपल्याचे म्हटले होते. त्यामुळे स्टेडियमही रिकामे झाले. परंतु नंतर सामना संपला नसून स्थगित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तसेच अर्जेंटिनाचा दुसरा गोल वैध होता की नाही, याचा तपास सुरू असल्याचेही स्टेडियममधील स्क्रीनवर दाखवण्यात आले. ‘व्हीएआर’ने हा गोल ‘ऑफ-साइड’मुळे रद्द केला. अखेर जवळपास दोन तासांनी खेळाडूंना पुन्हा मैदानावर येऊन शेवटची तीन मिनिटे खेळावी लागली. यात अर्जेंटिनाला पराभव पत्करावा लागला आणि सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकांनी ‘फिफा’ व आयोजकांवर कडाडून टीका केली.

ही एखादी स्थानिक स्पर्धा नसून ऑलिम्पिक आहे. येथे सर्वोच्च दर्जाचा खेळ आणि स्पर्धेचे आयोजन अपेक्षित असते. मात्र, जे झाले ते एखाद्या ‘सर्कस’पेक्षा कमी नव्हते. मी खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून यापूर्वी असा प्रकार कधीही पाहिलेला नाही. – जेव्हिअर मॅशेरानो, अर्जेंटिनाचे प्रशिक्षक.