भारताने जागतिक हॉकी लीग स्पर्धेतील पुरुष गटात लागोपाठ दुसरा विजय नोंदविला. त्यांनी ओमानवर ९-१ अशी मात केली.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचेच वर्चस्व राहील ही अपेक्षा होती. मात्र ओमानने दिलेल्या चिवट लढतीमुळे हा सामना अपेक्षेइतका एकतर्फी झाला नाही. ओमानने केलेला एक गोलही त्यांच्यासाठी विजय मिळविण्यासारखीच कामगिरी ठरली. भारताकडून रुपींदरपाल सिंग याने तीन गोल केले तर व्ही. आर. रघुनाथ व नितीन थिमय्या यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. मनदीप सिंग व गुरजिंदर सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओमानचा एकमेव गोल पेनल्टी कॉर्नरद्वारा नोंदविला गेला.
सामन्याच्या सुरुवातीपासून भारताने धारदार आक्रमण केले. तिसऱ्याच मिनिटाला रघुनाथने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलात करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर पूर्वार्धात रुपींदर याने १३व्या व २०व्या मिनिटाला गोल केले. १५व्या मिनिटाला नितीन थिमय्या यानेही आपल्या खात्यावर एक गोल नोंदविला. पूर्वार्ध संपण्यापूर्वी ओमानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत नासिर व शिबली शामिर यांनी समन्वयाने गोल केला.  
उत्तरार्धात पुन्हा भारतीय खेळाडूंनी खेळावर नियंत्रण मिळविले. रुपींदर व रघुनाथ यांनी आपल्या नावावर आणखी एक गोल केला. ४१व्या मिनिटाला दांडगाईचा खेळ केल्याबद्दल रुपिंदर याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या अनुपस्थितीतही भारताने धारदार चाली केल्या. ४२व्या मिनिटाला मनदीपने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. नितीन थिमय्या व गुरजिंदर सिंग यांनी गोल करत भारताची बाजू बळकट केली. ओमानने अनेक वेळा जोरदार चाली करत भारतावर दडपण आणले होते. भारताने पहिल्या सामन्यात फिजी संघाचा १६-० असा धुव्वा उडविला होता.