बंगळूरु : गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान शाबूत राखायचे असल्याचे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही विभागांतील कामगिरी उंचावावी लागणार आहे. याची संधी त्यांना आज, गुरुवारी होणाऱ्या होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मिळणार आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका या दोनही संघांनी यंदाच्या स्पर्धेत चारपैकी केवळ एक सामना जिंकता आला आहे. त्यामुळे १० संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ सातव्या, तर इंग्लंडचा संघ आठव्या स्थानी आहे. दोन्ही संघांसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा ठरू शकेल. हा सामना बंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. या मैदानावर झालेल्या गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने मिळून ६७२ धावा केल्या होत्या. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही दोन्ही संघांकडून मोठय़ा धावसंख्येची अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा >>> ENG vs SL: बेन स्टोक्स दम्याशी झुंजत आहे? इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सराव करताना इनहेलर वापरतानाचा फोटो व्हायरल
इंग्लंडच्या संघात सामने एकहाती जिंकवून देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा पल्ला गाठला होता. त्याच खेळपट्टीवर इंग्लंडचा संघ १७० धावांतच गारद झाला. त्याआधीच्या सामन्यात जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला अफगाणिस्तानने पराभूत केले होते. त्यामुळे इंग्लंडच्या संघावर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण आहे.
दुसरीकडे, पहिले तीनही सामने गमावणाऱ्या श्रीलंकेने गेल्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असेल. त्यातच मथीश पथिराना जायबंदी झाल्याने त्याच्या जागी माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा श्रीलंकेच्या चमूत समावेश करण्यात आला आहे. त्याचा अनुभव श्रीलंकेसाठी फायदेशीर ठरू शकेल.
’ वेळ : दु. २ वाजता ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप