Cricket In 2028 Olympics: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटच्या समावेशावर शिक्केमोर्तब झाले असून, २०२३ मध्येच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनने याला मान्यता दिली होती. १९०० मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. परंतु, त्यानंतर झालेल्या स्पर्धांमधून क्रिकेट वगळण्यात आले होते. पण, आता पुन्हा एकदा समावेश केल्याने, तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. १९०० मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन फक्त या दोन संघांनीच या खेळात भाग घेतला होता. ही स्पर्धा फक्त पुरुष संघांमध्ये झाली आणि ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक जिंकले होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनने आता स्पष्ट केले आहे की २०२८ च्या एलए ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी ६ संघ क्रिकेटमध्ये सहभागी होतील. हे सामने टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळवले जातील.

विशेष म्हणजे, २०२८ च्या एलए ऑलिंपिकमध्ये फक्त सहा पुरुष आणि सहा महिला संघ भाग घेणार असल्याने, पात्रता स्पर्धा क्रिकेट खेळणाऱ्या अव्वल देशांमध्ये होण्याची अपेक्षा आहे. नियमित आयसीसी स्पर्धांपेक्षा वेगळे, पहिल्या तीन संघांसाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके असतील, त्यामुळे सहा सहभागी संघांपैकी तीन संघांना पदके मिळतील.

दरम्यान, ऑलिम्पिकची पात्रता फेरी कशी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु पुरुष गटात भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या दिग्गज संघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, महिला संघांनाही पात्रता मिळविण्यासाठी कठीण स्पर्धेचा सामना करावा लागेल. यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान महिला आणि श्रीलंका या संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटसाठी ९० खेळाडूंचा कोटा मंजूर केला, ज्यामुळे सहभागी होणाऱ्या संघांना या सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करता येणार आहे. ऑलिंपिकसाठी पात्रता निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत, परंतु अमेरिका यजमान असल्याने त्यांना थेट पात्रता मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाच जागा रिक्त राहतील. ऑलिंपिकसाठी पात्रता रँकिंगद्वारे निश्चित केली जाऊ शकते, म्हणजेच अव्वल पाच संघ आणि यजमान अमेरिका ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी ऑलिंपिक गेम्समध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश झाला आहे. आयओसीने २०२३ मध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली होती.