वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राने क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतून निवृत्तीची घोषणा गुरुवारी केली. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. मात्र, गेल्या वर्षीपर्यंत तो ‘आयपीएल’मध्ये खेळत होता.

‘‘मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे ४२ वर्षीय मिश्राने सांगितले. त्याने २२ कसोटी, ३६ एकदिवसीय आणि १० ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. तिन्ही प्रारूपांत मिळून त्याने १५६ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००८ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या पाच वर्षांआधी २००३ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज फिरकीपटूंच्या उपस्थितीमुळे मिश्राला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागली.

‘‘प्रथमश्रेणीत २००० मध्ये पदार्पण केल्यापासून क्रिकेटमधील माझी कारकीर्द संस्मरणीय राहिली आहे. मी ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी, हरियाणा क्रिकेट संघटना, साहाय्यक, माझे सहकारी आणि माझे कुटुंबीय यांचा आभारी आहे. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच माझी कारकीर्द बहरली. क्रिकेटमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. यामधून मिळालेल्या आठवणी माझ्या आयुष्यासाठी मोलाच्या आहेत,’’ असे मिश्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

‘आयपीएल’च्या २०२४च्या हंगामात त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अखेरचा सामना खेळला. निवृत्तीनंतरही खेळाशी संबंध तोडणार नसल्याचे मिश्राने सांगितले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५३५ बळी मिळवले. देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट (लिस्ट ए) आणि ट्वेन्टी-२० मध्ये त्याने अनुक्रमे २५२ आणि २८५ गडी बाद केले. ‘आयपीएल’मध्ये तो डेक्कन चार्जर्स, सनराजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊकडून खेळला. यात त्याने २३.९८च्या सरासरीने १६६ गडी बाद केले. ‘आयपीएल’मध्ये तीन हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.