पोर्तुगालचा फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. रोनाल्डोने आपल्या फुटबॉल कौशल्याने आजवर करिअरमध्ये यशाचे शिखर गाठले. २०१६ हे वर्ष रोनाल्डोसाठी त्याच्या करिअरमधील खूप महत्त्वाचे ठरले. रोनाल्डोने पॅरिसमध्ये झालेली युरोपियन चॅम्पियनशीप जिंकली. रोनाल्डोच्या फुटबॉलसह त्याच्या लूक्सवरही असंख्य चाहते फिदा आहेत. रोनाल्डोची हेअरस्टाईल, त्याची खेळण्याची पद्धत हे सगळं अगदी जसंच्यातसं फॉलो करण्यासाठी चाहते काहीही करण्याची तयारी ठेवतात. मदैरा शहरानेही रोनाल्डोवरील आपल्या प्रेमापोटी शहराच्या विमानतळाचे नामकरण करून ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो एअरपोर्ट’ असे केले आहे. खुद्द रोनाल्डोच्या उपस्थितीत या विमानतळाचे नामकरण करण्यात आले.
रोनाल्डोचे नाव विमानतळाला देण्याचे अभिनव पाऊल मदैराने उचलले असले तरी ‘करायला गेले एक आणि झाले भलतेच..’ असंच काहीसं मदैरा प्रशासनाचे झाले आहे. कारण ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव देण्यात आलेल्या विमानतळावर रोनाल्डोचा कांस्य पुतळा देखील उभारण्यात आला आहे. रोनाल्डोच्या चेहऱयाची प्रतिकृती असलेल्या या पुतळ्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. रोनाल्डोची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला असल्याचे हा पुतळा पाहून स्पष्ट होते. नेटिझन्सने हाच धागा पकडून रोनाल्डोच्या पुतळ्याची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली.
The Cristiano Ronaldo bust at the airport carrying his name. This is Art Attack… pic.twitter.com/tTVmQBMgms
— Simon Peach (@SimonPeach) March 29, 2017
¯_(ツ)_/¯ when you try to sculp Ronaldo and it looks more like the Mask pic.twitter.com/8kSZEb2hYW
— Sergio & Associates™ (@Sergio_R81) March 29, 2017
दरम्यान, मदैराकडून मिळालेल्या सन्मानाचे रोनाल्डोने आभार व्यक्त केले. आपलं नाव एखाद्या विमानतळाला असणं हे खूप अभिमानास्पद आहे. मला माझ्या शहराचा आणि देशाचा अभिमान आहे. प्रशासनाचे आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असे रोनाल्डो म्हणाला.