ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीच्या वेगाचे जगभरात लाखो चाहते होते आणि अजूनही आहेत. अनेक नवोदित खेळाडू आजही ब्रेट लीला आपला आदर्श मानतात. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा डेव्हॉन कॉनवेदेखील त्यापैकीच एक आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नईच्या संघासाठी सलामीवीराची जबाबदारी पार पाडणारा कॉनवे लहानपणापासून ब्रेट लीच्या वेगाचा चाहता आहे. त्याबाबत त्याने आपल्या बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, कॉनवेने त्याच्या बालपणीची एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. डेव्हॉन कॉनवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झालेला आहे. मात्र, तो सध्या न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून सामने खेळतो. जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला दक्षिण आफ्रिकन खेळाडू नील मॅकेन्झीशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली होती.

हेही वाचा – IND vs SA, 1st T20: दिल्लीतील उष्णतेसमोर बीसीसीआयनेही टेकले हात, नियमात केला बदल

कॉनवेने सांगितल्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत असताना त्याचे वडील लहान मुलांच्या संघाला फुटबॉलचे प्रशिक्षण देत होते. त्या संघामध्ये नील मॅकेन्झी नावाच्या मुलाचा समावेश होता. पुढे हा फुटबॉल खेळणारा मुलगा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात दाखल झाला. तेव्हा कॉनवेच्या वडिलांनी नील आणि लहानगा कॉनवे यांचे फोनवर बोलणे करून दिले होते. दोघांमधील फोनवरील संवाद फारच गमतीशीर होता. डेव्हॉन कॉनवे फोनवरील हे संभाषण उघड करताना म्हणाला, “मी म्हणालो, हाय नील मी डेव्हॉन आहे. मला तुम्हाला विचारायचे होते, ब्रेट लीची गोलंदाजी किती वेगवान आहे? त्यावर नीलने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘तुझ्या वडिलांच्या गाडीपेक्षा ब्रेट ली जास्त वेगवान गोलंदाजी करतो!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तेव्हा मला नीलचे उत्तर मेजशीर वाटले होते. मात्र, तो मला साध्या सोप्या उदाहरणातून ब्रेट लीच्या गोलंदाजीला किती भयानक वेग आहे, हे समाजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे या संभाषणाच्या १० वर्षांनंतर जोहान्सबर्गमध्ये मला नीलसोबत खेळण्याचे भाग्य मला मिळाले. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,’ असेही कॉनवे व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.