CWG 2022 Ind Vs ENG 1st Semi Final Result: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुरू असलेले टी २० महिला क्रिकेट रंगात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट मैदानावर खेळवल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला. अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारतीय संघाचे पदक निश्चित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला २० षटकांमध्ये सहा बाद १६०धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी पाठवले. इंग्लंडच्यावतीने कर्णधार ताली स्कायव्हरने सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारतीय गोलंदाज स्नेह राणाने दोन तर दिप्ती शर्माने एक गडी बाद केला. इंग्लंडचे तीन फलंदाज धावबाद झाले.

त्यापूर्वी, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. या दरम्यान, स्मृती मंधानाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. ३१ चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. त्यापूर्वी, तिने अवघ्या २३ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.

शफाली आणि कर्णधार हमनप्रीत कौर जास्त मोठी खेळी करू शकल्या नाहीत. मात्र, जेमिमाह रॉड्रिग्स आणि दिप्ती शर्माने शेवटच्या काही षटकांमध्ये संघाला चांगल्या स्थितीत आणले. जेमिमाहने ४४ धावांची खेळी केली तर दीप्तीने २२ धावा केल्या. भारताने निर्धारित २० षटकात पाच गडी गमावून १६४ धावा केल्या.

हेही वाचा – CWG 2022: इंग्लंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात स्मृती मंधानाचा ‘जलवा’; वेगवान अर्धशतक ठोकण्याचा केला विक्रम

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश करताना केवळ एक सामना गमावला होता. आता संघाने इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय मुलींचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी, भारतीय संघ अंतिम सामन्यात बहारदार खेळ करून सुवर्णपदक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसेल.

उपांत्य फेरीतील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीतील दुसरा संघही आजच निश्चित होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 ind w vs eng w 1st semi final india beat england by 4 runs vkk
First published on: 06-08-2022 at 18:57 IST