विराट कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून अचानक हटवण्यावरून वाद सुरू झाला आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ जाहीर केला होता. यासोबतच वनडे संघाचे कर्णधार बदलण्याबाबतही माहिती देण्यात आली. मात्र यासाठी बीसीसीआयने अवलंबलेल्या पद्धतीवर क्रिकेट चाहते आणि अनेक दिग्गज नाराज आहेत. बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करून विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार बनवले. आता पाकिस्तानचा हिंदू आणि माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली.

दानिशने त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला, “भारतीय क्रिकेट बोर्डाने ज्या प्रकारे कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले आहे. ती पद्धत योग्य नाही. ही माहिती सार्वजनिक करण्यासाठी बोर्डाने आणखी चांगला मार्ग शोधायला हवा होता.” कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करताना कनेरिया म्हणाला की, त्याला हा सन्मान मिळायला हवा होता. तो त्यास पात्र आहे.

या व्हिडिओमध्ये त्याने विराट कोहलीकडून वनडे कर्णधारपद काढून घेण्याचे कारण सांगितले आहे. कनेरिया म्हणाला, “राहुल द्रविडच्या प्रवेशानंतरच विराटचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय झाला. यासाठी त्याने विराटच्या अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादाचा हवाला दिला. कुंबळेही दक्षिण भारतातून येतो आणि द्रविडही तिथून येतो. पण भारतीय क्रिकेटमधील या दोन खेळाडूंची उंची आणि कर्तृत्व रवी शास्त्री यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विराटला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.”

हेही वाचा – काय करावं आता..! मॅराडोना यांचं ‘ते’ घड्याळ चोरणारा निघाला भारतीय; दुबईत केली चोरी अन्…

कनेरिया पुढे म्हणाला, “प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री कोहलीला त्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. पण राहुल द्रविडच्या बाबतीत असे होऊ शकले नाही. त्याचे कोहलीला ऐकावे लागले. दोघांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. द्रविड आणि कोहली यांची जोडी जमणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि तसेच झाले. रोहितकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले. काही काळानंतर तुम्हाला दिसेल, की विराट कोहलीकडून कसोटीचे कर्णधारपदही काढून घेतले जाईल आणि रोहित कसोटीचा कर्णधार असेल किंवा बीसीसीआय ही जबाबदारी केएल राहुलकडेही सोपवू शकते. मात्र, रोहितचा दावा मजबूत आहे.”