Dean Elgar reveals about Virat Kohli : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला होता. निवृत्तीला एक महिनाही उलटलेला नाही तोच त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एल्गरने २०१५ च्या भारत दौऱ्याशी संबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्यावर थुंकल्याचा दावा त्याने केला आहे. एल्गरच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
एल्गरने विराटला बॅटने मारण्याची दिली होती धमकी –
दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१५ मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. पहिली कसोटी मोहालीत खेळली गेली. भारताने हा सामना १०८ धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर मालिका ३-० अशी जिंकली. पहिल्या कसोटीदरम्यान कोहली आपल्यावर थुंकल्याचा दावा एल्गरने केला आहे. कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर कोहलीची ही पहिलीच कसोटी मालिका होती. एल्गरने अजून एक खुलासा केला की, त्याने कोहलीला धमकी दिली होती की, पुन्हा असे केल्यास तो त्याला बॅटने मारेल.
“रवींद्र जडेजा आणि कोहली माझ्यावर थुंकले”-
एल्गरने यूट्यूब चॅनलवरील संभाषणात सांगितले की, “त्या मालिकेदरम्यान खेळपट्टीवरुन विनोद केले जात होते. रविचंद्रन अश्विनविरुद्ध फलंदाजी करताना मला लय कायम ठेवायची होती. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि कोहली माझ्यावर थुंकले. मी त्यांना सांगितले की, जर त्यांनी असे पुन्हा केले तर मी त्यांना बॅटने मारेन.” यानंतर जेव्हा एल्गारला विचारण्यात आले की कोहलीला तुमची स्थानिक भाषा समजली होती का? यावर एल्गर म्हणाला की कोहलीला समजले होते. कारण एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून खेळत होता.
हेही वाचा – IND vs ENG : पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; आयसीसीची जसप्रीत बुमराहवर मोठी कारवाई
एल्गर आणि कोहली यांच्यात झाली होती शिवीगाळ –
एल्गर पुढे म्हणाला, “हो, त्याला समजले होते. डिव्हिलियर्स आरसीबी संघात त्याचा सहकारी होता. मग मी म्हणालो की जर तू असे पुन्हा केलेस तर मी तुला या जमिनीवर ****, तुला इथेच आपटेन देईन. आणि मग तो म्हणाला **** (कोहलीची नक्कल करत), तुम्ही चुकीच्या ठिकाणी बोलत आहात. असो, आम्ही भारतात होतो त्यामुळे थोडं सावधही राहायचं होतं.” तथापि, एल्गरने याचाही खुलासा केला की जेव्हा भारतीय संघ २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा कोहलीने ड्रिंक्स दरम्यान केलेल्या वर्तनाबद्दल माफी मागितली होती.
एल्गर हा स्टार खेळाडू होता, पण त्याच्या खेळानुसार त्याला जसा सन्मान मिळणे अपेक्षित होते, तसा कधीच मिळाला नाही. या गोष्टीची खंत एल्गारच्या बोलण्यातूनही अनेकदा व्यक्त झाली आहे. २०१८ मध्ये, डीन एल्गरने आपली खंत व्यक्त करताना सांगितले की त्याने जे काही केले त्याचे त्याला जास्त श्रेय दिले जात नाही. इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना एल्गर म्हणाला होता की, “मी यापूर्वी जे काही केले त्याचे मला फारसे श्रेय दिले गेले नाही. माझ्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांमध्ये फार मोठे नाते आहे, असे मला वाटत नाही. बऱ्याच काळापासून, मी जे काही केले ते पलंगाखाली गाडल्यासारखे वाटले. प्रत्येक संघात माझ्यासारख्या क्रिकेटपटूंची गरज आहे, हे लोक विसरतात.”