टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आता अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. एकीकडे करोना साथीमुळे स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम असतानाच आता परदेशी ऑलिम्पिक पथकांच्या संख्येत मोठी घट होण्याचे संकेत जपानमधील शासकीय सूत्रांनी दिले आहेत.

जपानमधील फक्त दोन टक्के नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत झाले असून तेथे सध्या करोनाची चौथी लाट ऐन भरात आहे. मात्र ऑलिम्पिक क्रीडानगरीतील सर्वाचे जुलै महिन्यापर्यंत लसीकरण करण्यात येईल, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिले आहे. ऑलिम्पिकसाठी एकूण जवळपास दोन लाख परदेशी खेळाडू, प्रशिक्षक, सामनाधिकारी, पदाधिकारी आणि अन्य साहाय्यकांचा टोक्यो प्रवास अपेक्षित आहे.

परंतु जपान केंद्र शासन, ‘आयओसी’ आणि टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समिती यांच्यात झालेल्या बैठकीनुसार आता फक्त ६९ हजार विदेशी नागरिकांनाच जपानमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे समजते. या ६९ हजारांत १५ हजार खेळाडू, १० हजार प्रशिक्षक आणि ४४ हजार कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. टोक्यो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून तर, पॅरालिम्पिकला २४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. पॅरालिम्पिकसाठी २५ हजार परदेशी खेळाडूंनाच प्रवेश देण्यात येण्याची शक्यता आहे.

‘‘करोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच ऑलिम्पिकशी निगडिीत कार्यरत असणाऱ्या जपानमधील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येऊ नये, यासाठी विदेशी खेळाडू आणि अन्य अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्याशिवाय पदाधिकाऱ्यांना ऑलिम्पिकदरम्यान खेळाडू किंवा प्रशिक्षकांना भेटण्यास मनाई असून जपानमध्ये दाखल झाल्यावर सर्वानाच १४ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य असेल,’’ असे टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा बाख १२ जुलैला टोक्योत पोहोचणार

‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाख टोक्यो ऑलिम्पिकसाठी ११ दिवस बाकी असताना म्हणजे १२ जुलै रोजी जपानला पोहोचणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मे महिन्यात बाख जपान दौऱ्यावर जाणे अपेक्षित होते. मात्र करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यांचा दौरा लांबणीवर पडला. या दौऱ्यादरम्यान बाख जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांचीही भेट घेणार आहेत.