भारत ‘ब’ संघाची विजयी सलामी; अपराजितचीसुद्धा शतकी खेळी
देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा : – महाराष्ट्राचा प्रतिभावान सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (११३) साकारलेल्या दिमाखदार शतकाला बाबा अपराजितच्या (१०१) शतकाचीसुद्धा अप्रतिम साथ लाभल्यामुळे भारत ‘ब’ संघाने गुरुवारी देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत ‘अ’ संघाला १०८ धावांनी धूळ चारून विजयी सलामी दिली.
रांची येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत ‘ब’ संघाने प्रियांक पांचाळ (३) आणि युवा यशस्वी जैस्वाल (३१) यांना लवकर गमावले; परंतु २२ वर्षीय ऋतुराजने अपराजितसह तिसऱ्या गडय़ासाठी १५८ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. आठ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावून ऋतुराज रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर अश्विननेच अपराजितला १०१ धावांवर धावचीत केले. अखेरच्या षटकांत विजय शंकर (२६) आणि कृष्णप्पा गौतम (नाबाद १९) यांनी फटकेबाजी केल्यामुळे भारत ‘ब’ संघाने ५० षटकांत ६ बाद ३०२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार हनुमा विहारी (५९) आणि इशान किशन (२६) यांना मोठी खेळी करता आली नाही. रूश कलारिया (३/२०) आणि मोहम्मद सिराज (२/३०) यांच्या वेगवान माऱ्यापुढे भारत ‘अ’ संघाचा डाव ४७.२ षटकांत १९४ धावांत संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘ब’ : ५० षटकांत ६ बाद ३०२ (ऋतुराज गायकवाड ११३, बाबा अपराजित १०१; रविचंद्रन अश्विन २/४०) विजयी वि. भारत ‘अ’ : ४७.२ षटकांत सर्व बाद १९४ (हनुमा विहारी ५९, इशान किशन २६; रूश कलारिया ३/२०).
आजचा सामना
- भारत ‘अ’ वि. भारत ‘क’
- वेळ : सकाळी ९ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २
