भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाचा निर्धार
रिओ येथील पॅरालिम्पिकमधील भालाफेकीत सुवर्णपदकजिंकणारा खेळाडू देवेंद्र झाझरियाने टोकियामध्ये पुन्हा सुवर्णपदक मिळवत तिहेरी कामगिरी करीन, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
देवेंद्रने अॅथेन्स येथे २००४ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सोनेरी कामगिरी केली होती. दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. ‘‘रिओ येथून परतल्यानंतर मी माझा सराव थांबवलेला नाही. अजूनही माझ्याकडे पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे. मी दररोज सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास सराव करतो. आतापर्यंत दोन वेळा मी पॅरालिम्पिक विजेतेपद मिळवताना विश्वविक्रम केला आहे. अर्थात त्यावर मी समाधानी नाही. मला अजून भरपूर मोठी कामगिरी करावयाची आहे. पॅरालिम्पिकमध्ये कोणते क्रीडा प्रकार व कोणते गट ठेवायचे याचा निर्णय आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक महासंघाकडून घेतला जातो. लंडन येथे पुढील वर्षी जागतिक मैदानी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत कोणत्या प्रकाराच्या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णयही त्यांच्याकडून घेतला जाईल. अर्थात माझा क्रीडाप्रकार तेथे असेल, असे गृहीत धरून मी सराव करत आहे,’’ असे देवेंद्रने सांगितले.
पॅरालिम्पिकपटूंची पद्म पुरस्कारासाठी शिफारस
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार आहे. क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ‘ट्विटर’द्वारे ही माहिती दिली. पदकविजेत्या चारही खेळाडूंना पद्म सन्मान द्यावा, अशी क्रीडा मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे शिफारस केली जाणार आहे. भारताच्या थांगवेलू मरियप्पन (उंच उडी) व देवेंद्र झाझरिया (भालाफेक) यांनी रिओ येथे झालेल्या स्पध्रेमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर दीपा मलिकने गोळाफेकीत रौप्यपदकाची कमाई केली. वरुणसिंग भाटीने उंच उडीत कांस्यपदक मिळवले.