भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, अशी स्तुतीसुमने आयसीसीने उढळली आहेत. सात जुलै रोजी एम.एस धोनीचा वाढदिवस आहे. रविवारी धोनी ३८ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने धोनीच्या करियरचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत तोंडभरून कौतुक केले आहे.

आयसीसीने एक व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. धोनीने भारताला आयसीसीच्या तिन्ही स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. टी२० आणि एकदिवसीय विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीने भारताला जिंकून दिली आहे. असा पराक्रम करणारा धोनी जगातील पहिलाच कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले होते. धोनीच्या या कार्याचा आढावा घेणारा एक व्हिडीओ आयसीसीने ट्विट केला आहे.

आयसीसीने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये धोनीच्या महत्वाच्या खेळीचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे, भारतीय कर्णधार विराट कोहली, अव्वल गोलंदाज बुमराह, इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांचीही धोनीबद्दलची मतं जाणून घेतली आहेत.