World cup 2023 : ५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतलं ४९ वं शतक झळकवलं. विराटच्या या कामगिरीमुळे वन डे क्रिकेटमध्ये ४९ वेळा शतक झळकवण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. त्यानंतर विराट कोहलीच्या या कामगिरीची प्रचंड चर्चा आहे. अशात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये सलमान खानच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने एक उत्तर दिलं होतं. ११ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सचिन जे बोलला होता ते विराटने करुन दाखवलं असं चाहते म्हणत आहेत.

मुकेश अंबानी यांनी आयोजित केला होता कार्यक्रम

११ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने जेव्हा शतकांचं शतक केलं. म्हणजेच १०० शतकांचा त्याचा रेकॉर्ड पूर्ण झाला तेव्हा मुकेश अंबानी यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुकेश अंबानी, नीता अंबानी, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, प्रिती झिंटा, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जवळपास प्रत्येकाने सचिनविषयी काय वाटतं ते सांगितलं होतं. याच कार्यक्रमात सलमान खानच्या प्रश्नाला सचिनने उत्तर दिलं होतं. तोच हा व्हिडीओ आहे जो आता विराटच्या कामगिरीनंतर व्हायरल झाला आहे.

काय आहे या व्हिडीओत

सलमान खान: सचिन तुला काय वाटतं? तुझा रेकॉर्ड कुणी तोडू शकेल का? सरळ सरळ सांगून टाक नाही तोडू शकणार (सगळ्यांचा हशा)
सचिन तेंडुलकर : मला वाटतं याच कार्यक्रमाला आलेले दोन तरुण खेळाडू असे आहेत जे माझा रेकॉर्ड तोडू शकतात.

सलमान खान : अरे चान्सच नाही… (पुन्हा हशा)

सचिन तेंडुलकर: मी पाहतोय या तरुण खेळाडूंकडे, जे माझा रेकॉर्ड तोडू शकतात.

सलमान खान : कोण आहे ते?

सचिन तेंडुलकर : विराट कोहली आणि रोहित हे दोघे ते खेळाडू आहेत जे माझा रेकॉर्ड मोडू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं सचिन तेंडुलकर या कार्यक्रमात म्हणाला होता. सचिनने एक प्रकारे जे भाकीत केलं होतं ते खरं झालं आहे. कारण विराटने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वन डे क्रिकेटमध्ये सचिनची ४९ शतकं झाली होती. त्याचप्रमाणे विराटचीही ४९ शतकं झाली आहेत. आता विराट आगामी काळात आपला फॉर्म आणखी सुधारुन सचिनचा क्रिकेटमध्ये १०० शतकांचाही विक्रम मोडू शकतो असं म्हणायला हरकत नाही.