भारतीय संघाचा यष्टीरक्षक फिनिशरची भूमिका बजावणारा फलंदाज दिनेश कार्तिकन आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. यानंतर त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता तो समालोचन आणि कोच या भूमिकांमध्ये दिसतो. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबी संघाचा फलंदाजी कोच होता. सध्या दिनेश कार्तिक भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांचे समालोचन करताना दिसतो. यादरम्यान दिनेश कार्तिकने त्याच्या कसोटी निवृत्तीबाबत बोलताना रवी शास्त्री यांच्याविषयी मोठा खुलासा केला.
दिनेश कार्तिकने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि पुन्हा संघाबाहेर झाला आहे. जेव्हा जेव्हा दिनेश कार्तिकने पुनरागमन झालंय तेव्हा त्याने दणक्यात कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये दिनेशने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं, वृद्धिमान साहाला दुखापत झाल्यामुळे त्याला कसोटी पुनरागमनाची संधी मिळाली. यावेळेस त्याने अफगाणिस्तानविरूद्ध एक आणि इंग्लंडविरूद्ध २ कसोटी सामने खेळले होते आणि ५ डावांमध्ये २५ धावा आणि २ वेळा डकवर बाद झाला होता. कार्तिकच्या या कामगिरीनंतर भारताने ऋषभ पंतला पदार्पणाची संधी दिली. पंतने पदार्पणाच्या सामन्यातच ओव्हलच्या मैदानावर शतक झळकावलं होतं.
२०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स येथे खेळलेला दुसरा कसोटी सामना कार्तिकचा रेड-बॉल क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. त्याने व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये आणखी दोन वेळा पुनरागमन केलं, पण २०१८ मध्ये त्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात आली. कार्तिकने २६ कसोटी सामन्यांमध्ये १०२५ धावा केल्या. त्याचे एकमेव शतक २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध मिरपूरमध्ये त्याने केलं होतं.
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने त्याच्या अखेरच्या कसोटी सामन्याची आठवण काढली. रवी शास्त्री, मायकेल अथर्टन आणि नासीर हुसेन यांच्यासह स्काय स्पोर्ट्सच्या पोडकास्टमध्ये त्याच्या कसोटी निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.
दिनेश कार्तिक पोडकास्टमध्ये म्हणाला, “माझ्या आणि नासीर हुसेनच्या कामगिरीमध्ये फारसं साम्य नाही. पण दुर्दैवाने त्याची कारकिर्द लॉर्ड्सवर संपली आणि माझीही. फरक एवढाच की नासीर हुसेनने स्वत: कारकीर्दीचा शेवट करत तो कोचिंगकडे वळला, तर माझ्या बाबतीत कोच मला येऊन म्हणाले, पुढच्या कसोटी सामन्यासाठी येऊ नकोस, तुझी कारकीर्द संपली आता.” कार्तिकचं हे बोलणं ऐकून पोडकास्टसाठी असलेले सर्व दिग्गज चांगलेच हसू लागले.