वृत्तसंस्था, सिंगापूर

भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीमधील मंगळवारी झालेल्या दुसऱ्या डावात गतविजेत्या डिंग लिरेनला बरोबरीत रोखले. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशने अर्ध्या गुणाची कमाई केली. १४ डावांच्या या लढतीत सोमवारी झालेल्या पहिल्या डावात लिरेनने विजय मिळविला होता. त्यामुळे आता दोन डावांनंतर लिरेन १.५-०.५ असा आघाडीवर आहे.

‘‘जागतिक अजिंक्यपद लढतीत काळ्या मोहऱ्यांसह डाव बरोबरीत सोडवणे कधीही चांगले असते. ही लढत अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आम्हा दोघांकडेही अजून खूप वेळ आहे,’’ असे गुकेश दुसऱ्या डावानंतर म्हणाला. जगज्जेतेपदाच्या लढतीत १८ वर्षीय गुकेश सर्वांत युवा आव्हानवीर आहे.

पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर गुकेश पटावर चाली रचताना संघर्ष करताना दिसून आला होता. मात्र, दुसऱ्या डावात गुकेशने आपल्या चुका सुधारल्या. दुसरीकडे, पहिल्या डावातील विजयानंतर लिरेनने लगेच आक्रमक चाली रचणे विचारपूर्वक टाळले. फार धोका न पत्करता लिरेनने आपल्या चाली खेळल्या. गुकेशने २३व्या चालीनंतरच बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

हेही वाचा >>>Gautam Gambhir : गौतम गंभीरने अचानक सोडली टीम इंडियाची साथ, कसोटी मालिका अर्धवट सोडून का परतला मायदेशी?

लिरेनने गेल्या वर्षी प्रतिस्पर्धी इयन नेपोम्नियाशीविरुद्ध तीन वेळा पिछाडीनंतर बाजी मारली होती. त्यामुळे गुकेशलाही मुसंडी मारण्याची संधी आहे. ‘‘जागतिक अजिंक्यपद लढत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर दडपण असणे स्वाभाविक आहे. आम्हीही याला अपवाद नाही. मी या लढतीकडे एक आव्हान म्हणून बघत आहे. एका वेळेस एका डावाचा विचार करण्याकडे माझा कल आहे,’’ असे दुसऱ्या डावानंतर गुकेशने सांगितले.

‘‘पहिल्या डावात मी काही तरी नवीन खेळलो. त्यासाठी दृढ स्मरणशक्ती आवश्यक आहे. दुसऱ्या डावात मी फार काही वेगळे प्रयत्न केले नाहीत. आता तिसरा डाव मोठा असेल. गुकेश एक गुणाने पिछाडीवर आहे. त्याला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळेल. मात्र, मी आव्हानासाठी सज्ज आहे,’’ असे दुसऱ्या डावानंतर लिरेन म्हणाला.

लिरेनने पाचव्याच चालीला वजिराच्या बाजूकडील घोडा हलवून संयमी खेळाचे संकेत दिले. अशा पद्धतीने झालेले अनेक डाव यापूर्वी बरोबरीत सुटले आहेत. त्याला हा डावही अपवाद ठरला नाही. या डावात गुकेशला आपले मोहरे योग्य पद्धतीने पटावर चालवायचे होते. पटावरील परिस्थिती क्लिष्ट होणार नाही इतकेच त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. उंट आणि दोन्ही वजीर लवकर पटाबाहेर गेल्याचे चित्र होते. उर्वरित दोन घोडे, हत्तींची जोडी आणि आठ प्यादी अशा मोहऱ्यांसह दोन्ही खेळाडूंना यश मिळण्याची फारशी खात्री नव्हती. त्यामुळे दोघांनी दुसरा डाव बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या डावात अतिउत्साहाने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या गुकेशने दुसऱ्या डावात संयमाने खेळ केला आणि त्याने इटालियन पद्धतीने सुरुवात करणाऱ्या डिंग लिरेनविरुद्ध जराही धोका न पत्करता अवघ्या २३ चालीत बरोबरी मान्य केली. इटालियन भाषेत या सुरुवातीचे नाव गायको पियानो असे आहे आणि त्याचा अर्थ शांत डाव असा होतो. त्या नावाला साजेसा खेळ दोघा खेळाडूंनी केला. अवघ्या १२व्या खेळीत वजिरावजिरी झाल्यामुळे डाव बरोबरीत सुटणार हे जवळपास निश्चित झाले होते. आघाडीवीर जगज्जेता डिंग मुद्दाम शांतपणे खेळून मागे पडलेला गुकेश स्वत:हून चुका करतो का, याची चाचपणी करत होता. मात्र, पहिल्या डावातील हृदयविदारक पराभवानंतर गुकेशला आपले गुणांचे खाते उघडण्यात यश आलेच. आता आज तिसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणारा गुकेश डिंगवर दडपण आणण्यासाठी काय डावपेच खेळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. – रघुनंदन गोखलेद्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक